कार्ला फाट्यावर ओव्हर ब्रीज उभारणार; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

98

मावळातील वन विभागाच्या जागेतील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार, एकविरा देवी मंदीर परिसराचा होणार कायापालट

पिंपरी, दि. ८ (पीसीबी)-मावळ तालुक्यातील अनेक गावातील, आदिवासी पाड्यांना जोडणा-या रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. वन विभागाच्या जागेतून जाणा-या या रस्त्यांसाठी जिल्हा वनसंरक्षक अधिकारी, जिल्हाधिका-यांनी तत्काळ परवानगी देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच आई एकविरा देवी मंदीर परिसर विकासासाठी 24 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून आणखी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होईल. याशिवाय वाहतूक कोंडी आणि अपघातांचा ‘ब्लॅकस्पॉट’ होत असलेल्या कार्ला फाटा येथे ओव्हर ब्रीज उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

मावळ तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार बारणे यांनी बुधवारी (दि.7) जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली. प्रशासनाला विविध सूचना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकुश गोयल, जिल्हा वनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील, प्रांतअधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार मधूसुदन बर्गे, गटविकास अधिकारी एस. पी. भागवत, बी,बी दरवडे, उपअभियंता धनराज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, उप जिल्हाधिकारी भूसंपादन प्रवीण साळुंखे, कार्यकारी अभियंता ओ. बी. पाटील, आर. वाय. तहसीलदार धनंजय जाधव, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, शहरप्रमुख निलेश तरस, विशाल हुलावळे, राजेंद्र तरस उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”मावळातील अनेक गावातील रस्ते वनविभागाच्या जागेतून जातात. वन विभागाचे स्थानिक अधिकारी रस्त्याचे काम करुन देत नाहीत. मशिन उचलून नेतात. त्यामुळे अनेक वर्षांपासून आदिवासी पाड्यांकडे जाणा-या रस्त्यांचे काम प्रलंबित आहे. माझ्या अधिकारातील सर्व परवानग्या तत्काळ देतो. काही परवानग्या केंद्र सरकार देते. त्याबाबतचे प्रस्ताव तयार करुन पाठवितो, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. रस्त्यांची कामे अडवू नये अशा वनरक्षक अधिका-यांना सूचना दिल्या. त्यामुळे वनविभागाच्या जागेतून जाणा-या रस्त्यांची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. केंद्र सरकारच्या परवानग्या मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला रस्त्यांचा प्रश्न निकाली निघणार आहे”.

”आई एकविरा मंदीर परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मिळाला आहे. याबाबत नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. एकविरा मंदीर परिसराच्या विकासासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी)च्या माध्यमातून निधी देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. 24 कोटी रुपयांचा निधी सुशोभीकरणासाठी दिला आहे. पुरातत्व विकासाच्या सहमतीने विकास कामे केली जाणार आहेत. पाय-या दुरुस्त, दर्शन शेड उभारणे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची कामे केली जाणार आहेत. भाविकांच्या वाहनांसाठी वनखाते आणि खासगी जागेत वाहनतळाची तत्काळ व्यवस्था करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पर्यटनाला चालना आणि भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा एकविरा देवी मंदीर परिसरात देण्यात येणार असल्याचे” खासदार बारणे यांनी सांगितले. मावळात गडकोट किल्ले, लोणावळा-खंडाळा अशी विविध पर्यटन ठिकाणे आहेत. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी. पर्यटकांना यंत्रणेचा कोणताही त्रास होवू नये. पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करावी. काही अनुचित प्रकार घडला. तर, तत्काळ मदत करावी, अशा सूचना पोलिसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्ला फाट्यावर ओव्हर ब्रीज उभारणार

कार्ला फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सातत्याने अपघातही होतात. हा अपघातांचा ‘ब्लॅकस्पॉट’ झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकतीच चर्चा झाली. ओव्हर ब्रीज उभारण्याची विनंती केली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कार्ला येथे ओव्हर ब्रीज उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना दिल्या. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने हा रस्ता राज्य सरकारकडे हस्तांतरित केला नाही. केवळ देखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे. त्यामुळे ओव्हर ब्रीज उभारण्यासाठी एनएचएआयचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मी घेणार आहे. त्यामुळे लवकरच कार्ला फाट्यावर ओव्हर ब्रीज उभारण्याच्या कामाला सुरुवात होईल, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.

‘त्या’ 13 गावांचा स्मशानभूमीचा प्रश्न निकाली

”मावळात टाटाचे धरण आहे. धरण परिसरातील 13 गावांना स्मशानभूमीला जागा उपलब्ध नव्हती. एखाद्याचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार कोठे करायचे असा प्रश्न गावक-यांसमोर होता. त्यामुळे टाटा पावरने स्वत:च्या मालकीची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठविला आहे. जिल्हाधिका-यांनी त्याला तत्काळ मान्यता देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे या 13 गावात स्मशानभूमी विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच घोडेश्वर येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी एक जागा देण्याचाही निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यातील बाह्यवळण (रिंगरोड) रस्त्यामध्ये गेलेल्या जागेचा मोबदला बाजारभावापेक्षा कमी मिळाल्याच्या तक्रारी चांदखेड आणि पाचाणे गावातील शेतकऱ्यांची आहे. त्याचा फेरआढावा घेवून त्रुटी दूर केल्या जातील. शेतक-यांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिका-यांनी दिल्याचे”ही खासदार बारणे यांनी सांगितले.