काँग्रेसकडे लाईट बिल भरायलाही पैसे नाहीत, सर्व खाती गोठवली

0
94

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना आता पक्षाच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. पक्षाकडून भारत जोडो न्याय यात्रा आणि निवडणुकीचे नियोजन सुरू असतानाच मोदी सरकारने पक्षाची सर्व बँक खातीच गोठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार अजय माकन यांनी शुक्रवारी मीडियाला ही माहिती दिली. राष्ट्रीय काँग्रेस तसेच युवक काँग्रेसची बॅंक खाती गोठवण्यात आली आहे. आता कसलाही खर्च करण्यासाठी पक्षाकडे पैसे नाहीत. वीज बिल भरायला, कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही पैसे नसल्याचा दावा माकन यांनी केला आहे.

बँक खाती गोठवण्यात आल्याने सर्वच गोष्टींवर परिणाम होणार आहे. केवळ न्याय यात्राच नाही, तर सर्व राजकीय कार्यक्रमांवरच विपरीत परिणाम होईल, असे माकन यांनी सांगितले. आम्ही दिलेले चेक बँकेतून पुढे जात नसल्याची माहिती आम्हाला काल मिळाल्याचे माकन यांनी स्पष्ट केले.

इन्कम टॅक्स विभागाकडून काँग्रेस व युवक काँग्रेसचे बँक खाते गोठवण्यात आल्याचे माकन यांनी सांगितले. काँग्रेस व युवक काँग्रेसकडे 210 कोटी रुपयांची रिकव्हरी असल्याचे इन्कम टॅक्स विभागाकडून कळवण्यात आले आहे. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून मिळालेले पैसेही या खात्यामध्ये आहेत.

निवडणुकीच्या दोन आठवडे आधी विरोधकांची बँक खाती गोठवणे म्हणजे लोकशाही गोठवल्यासारखे असल्याचा आरोप माकन यांनी मोदी सरकारवर केला. दरम्यान, सध्या काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी पक्षाकडून बराच पैसा खर्च केला जात आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींच्या सभा घेतल्या जात आहेत. राज्यांमध्ये पक्षाच्या बैठका, मेळावे सुरू आहेत, यापार्श्वभूमीवर बँक खाती गोठवल्यात आल्याने सर्व कार्यक्रम ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.