कस्टममध्ये पार्सल अडकले आहे सांगत महिलेची तब्बल 29 लाख रुपयांची फसवणूक

0
321

हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) – दिल्ली कस्टम येथे तुमचे पार्सल अडकले आहे ते घेण्यासाठी म्हणून महिलेची तब्बल 29 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ऑनलाईन पद्धतीने 8 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात 36 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.14) फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी सात वेगवेगळी बँक खाते धारक व 762793254 या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला संबंधित फोनवरून फोन करून दिल्ली कस्टम ऑफिस मधून बोलत असून शिवकुमार यांनी तुमच्यासाठी एक पार्सल पाठवले आहे. ते कलेक्ट करण्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल असे सांगितले. हे पार्सल मिळवण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण 29 लाख 20 हजार 700 रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतले. फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे.