- रेखा कुलकर्णी प्रथम तर, शरद शेजवळ द्वितीय
पिंपरी दि. २१ –
‘झाडे लावा, झाडे जगवा!’ हा संदेश देत कर्मयोगिनी महिला संस्था (पिंपरी चिंचवड – पुणे) आणि आर्य समाज मंदिर (पिंपरी) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित ‘झाडावर बोलू काही…’ हे विशेष कविसंमेलन मोठ्या उत्साहात आर्य समाज मंदिर, पिंपरी येथे शनिवार, दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका ॲड. प्रार्थना सदावर्ते होत्या; तसेच ज्येष्ठ साहित्यिक नागेश शेवाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम दंडीमे, आर्य समाज मंदिर ग्रंथालय सचिव दिनेश यादव आणि कर्मयोगिनी महिला संस्थेच्या अध्यक्षा सीमा गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘झाडावर बोलू काही…’ या प्रातिनिधिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
काव्यस्पर्धेत पिंपरी – चिंचवड, पुणे, मुंबई आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या सुमारे चाळीस कवींनी सहभाग घेऊन आपल्या वैविध्यपूर्ण कवितांच्या माध्यमातून मानवी जीवनात झाडांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. काव्यस्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :-
रेखा कुलकर्णी (प्रथम), शरद शेजवळ (द्वितीय), अश्विनी जगताप (तृतीय), अंजली डोळे (उत्तेजनार्थ १), किरण जोशी (उत्तेजनार्थ २), वंदना इन्नानी (उत्तेजनार्थ ३) विजेत्या कवींना सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथ प्रदान करून सन्मानित करण्यात आले; तसेच प्रातिनिधिक अंकात लेखन करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि सर्व सहभागी कवींना तुळशीचे रोप देण्यात आले. काव्यस्पर्धेत दिलीप आहिरे, योगिता जाधव, यशवंत देव, नागेश गव्हाड, फुलवती जगताप, नीलिमा फाटक, दशरथ धायगुडे, जयश्री श्रीखंडे, शोभा जोशी, सुप्रिया लिमये, ज्ञानेश्वर राणे, केशर भुजबळ, प्रतिमा काळे, प्रवीण प्रधान, अशोक वाघमारे, अशोक सोनवणे, रामचंद्र पाचुनकर, श्वेता कुडोळी, स्नेहा पाठक, मनीषा आवेकर, योगिता कोठेकर, बबन चव्हाण, वैष्णवी कुंभार, श्रद्धा चटप, राम सर्वगौड यांच्या कविता उल्लेखनीय होत्या.
वृक्ष तसेच वाल्मीकी रामायण आणि संविधान या ग्रंथांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सीमा गांधी यांनी प्रास्ताविकातून, ‘कर्मयोगिनी महिला संस्था ‘जागृती – सृजन – प्रगती’ हे ब्रीद घेऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे.’ अशी माहिती दिली. नागेश शेवाळकर यांनी, ‘चिंतन, मनन केल्याशिवाय कवींनी कवितालेखन करू नये; तसेच प्रसिद्धीच्या मागे लागू नये!’ असे आवाहन केले. उत्तम दंडीमे यांनी, ‘आपल्या संस्कृतीत जंगलांचे महत्त्व अनन्यसाधारण असून पूर्वी सर्व गुरुकुले ही जंगलात असायची. वृक्ष हे परोपकारी असल्याने मनुष्यानेही आपले जीवन परोपकारासाठी सार्थकी लावावे!’ असे आवाहन केले. ॲड. प्रार्थना सदावर्ते यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘आपल्या देशातील आदिवासी झाडांना आपले पूर्वज मानतात. झाडांमध्ये अलौकिक शक्ती असते. त्यामुळेच लावलेल्या अन् जगवलेल्या झाडांच्या संख्येवरून माणसांची श्रीमंती मोजली जावी!’ असे विचार मांडले.
रेणुका हजारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर रेवती साळुंखे यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले. शिरीष गांधी, संतोष गाढवे, हेमंत जोशी, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. ‘झाडे जगू दे रे महाराजा!’ असा कौल लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली