“कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी मिळणे गरजेचे! – ॲड. सचिन पटवर्धन

0
193

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) “राजकीय क्षेत्रात काम करताना पदाच्या माध्यमातून समाजाची उत्तम सेवा करता येते. त्यामुळे कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे!” असे विचार ॲड. सचिन पटवर्धन यांनी व्यक्त केले; तर विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी, “समाजात समन्वय साधण्यासाठी कार्यक्षम कार्यकर्त्यांची गरज असते; तसेच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणेसुद्धा जरुरी असते!” असे विचार विचार आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे बुधवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी व्यक्त केले. सलीम शिकलगार, सदाशिव खाडे, राजेश पाटील यांची अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि पिंपरी – चिंचवड विद्यापीठात महाराष्ट्र शासन निर्देशित नियामक सदस्यपदी नेमणूक झाल्याबद्दल अनुज मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात ॲड. सचिन पटवर्धन आणि आमदार उमा खापरे बोलत होत्या. माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांची व्यासपीठावर तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. यावेळी रमेश बनगोंडे यांची विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर नियुक्ती झाल्याबद्दल आणि सृष्टी मोरे या युवतीने २६ जानेवारी २०२४ रोजी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केल्याप्रीत्यर्थ मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना सलीम शिकलगार यांनी, “विद्यापीठ आणि समाज यांना जोडणारा सेतू म्हणून काम करण्याची इच्छा आहे. माझ्या सामाजिक कार्यात मोरे परिवार, पक्षातील वरिष्ठ आणि सहकारी तसेच समाजातील अनेक हितचिंतक दृश्य – अदृश्य रूपात नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा यांच्या पाठबळावर मी काम करीत राहणार आहे!” अशा भावना व्यक्त केल्या. सदाशिव खाडे आणि राजेश पाटील यांनी कृतज्ञतापर मनोगते व्यक्त केलीत. “माझ्या यशाचे श्रेय आई, आजी, मार्गदर्शक कर्नल शेखर आणि आपल्या सर्वांचे आहे!” अशा शब्दांतून सृष्टी मोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

श्रीराम, सरस्वती आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अनुप मोरे यांनी प्रास्ताविकातून, “सलीम शिकलगार यांनी असंख्य अडचणींवर मात करून सातत्याने सामाजिक कार्य केले आहे. माझ्या सामाजिक कार्यात त्यांनी नेहमी मोठ्या भावाप्रमाणे मला वागणूक दिली!” असे गौरवोद्गार काढले. श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
श्रोत्यांमधील मान्यवरांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केलीत; तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांनी सन्मानार्थींचा हृद्य सत्कार केला. अनुप मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. ज्योती कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले. शैलजा मोरे यांनी आभार मानले.