ओबीसीतूनच आरक्षण हवं, मनोज जरांगे यांची मागणी

0
136

जालना, दि. १८ (पीसीबी) – मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. तसंच आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर ते ठाम आहेत. सगे सोयरेंच्या अध्यादेशाची अमलबजावणी झाली नाही तर आम्ही २१ तारखेला आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. डॉक्टरांच्या पथकाने आज सकाळी मनोज जरांगेंची आरोग्य तपासणी केली. यावेळी पथकाने त्यांचा बीपी, शुगर आणि इतर तपासण्या केल्या. जरांगे यांनी आरोग्य पथकाला तपासणीसाठी सहकार्य केले असून त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे यावेळी डॉक्टरांनी म्हटलंय.

“आमचं मूळ म्हणणं हेच आहे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि सगेसोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण येऊच शकत नाही. ६२ टक्के आरक्षण आधीच दिलं आहे. आता किती टक्के देतात ते पाहू. पुन्हा एकदा चॅलेंजचा विषय येऊ शकतोच असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दिलेलं आरक्षण रद्द झालं तर आम्हाला आंदोलन करावंच लागणार आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे. तसंच आम्ही ओबीसीच आहोत, सगेसोयरे अमलबजावणीही करुन हवीच आहे. साडेतीन महिन्यांपासून काम सुरु आहे. प्रक्रिया साडेतीन महिन्यांपासून सुरु आहे. कोट्यवधी मराठ्यांचा हा विषय आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. जर २० तारखेला ते मिळालं नाही तर २१ तारखेला पत्रकार परिषद घेणार आणि पुढची दिशा ठरवणार” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

“आमची लढाई कशासाठी आहे हे सरकारलाही माहीत आहे आणि मराठ्यांनाही माहीत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे. २० तारखेला सगेसोयरेंच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा २० तारखेच्या आत स्पष्ट भूमिका केली नाही तर २१ तारखेला आम्ही आमची दिशा ठरवणार आहोत.” असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आमच्या मराठ्यांच्या लेकरांना जे काही आरक्षण दिलं आहे पण ते टिकलं नाही तर काय करायचं? आमची लेकरं सांगत आहेत की आमची चार वर्षे वाया गेली आहेत आम्ही काय करायचं आहे? आमच्या पोरांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं. पुन्हा तसंच झालं तर काय करणार? आम्हाला आंदोलन पुन्हा करावं लागणार.” असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.