एकनाथ शिंदे घेणार अमित शहांची भेट ?

32

मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असून एकनाथ शिंदे आज संध्याकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आपल्या 35 समर्थक आमदारांसोबत सुरतमध्ये असून ते आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये होणार तसेच भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील हे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या भेटीला गेले आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र पाठक हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. या दोघांवर एकनाथ शिंदे यांचे मन वळवून पुन्हा मुंबईला आणण्याची जबाबदारी आहे. तसं जरी नाही घडलं तरी इतर समर्थक आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न हे नेते करणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये असून त्यांना आणि समर्थक आमदारांना अहमदाबादला एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामागे दोन कारणं आहेत, एक म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा हे त्यांची भेट घेणार आहे. दुसरं म्हणजे शिवसेनेचे नेते सुरतमध्ये येत असल्याने त्यांची आणि एकनाथ शिंदे यांची भेट होऊ नये यासाठी गुजरात भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.