उद्योगनगरीत वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच कासारवाडीत सहा वाहनांची तोडफोड

0
66

भोसरी, 08 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पिंपळे गुरव येथे सप्टेंबर महिन्यात दहा दिवसातील दोन घटनांमध्ये 21 वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता कासारवाडीत सहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि. 6) रात्री समोर आली आहे. मात्र, घटनेला 20 तास उलटून गेल्यानंतरही भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

कासारवाडीतील केशवनगर येथे गुरूनानक सोसायटीलगत पवना नदीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात परिसरातील रहिवासी आपली वाहने पार्कींग करतात. रविवारी (दि. 6) रात्री साडेआठच्या सुमारास येथे उभ्या असलेल्या कार, टेम्पो ट्रॅव्हल्स अशा सहा वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मैदानाच्या आसपास सीसीटीव्ही नसल्याने पोलीसांना आरोपींचा माग काढण्यात अडचणी येत आहेत. रविवारी रात्री तसेच सोमवारी दिवसभरात कोणीही फिर्याद देण्यास आले नाही. त्यामुळे घटनेला 20 तास उलटून गेल्यानंतरही भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

पिंपळे गुरव येथील मयुरनगरीमध्ये 15 सप्टेबर रोजी दहशत माजविण्यासाठी दोन तरूणांनी 14 वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर 24 सप्टेबर रोजी रात्री त्याच ठिकाणी एकाने लाकडी दांडक्याने पुन्हा सात वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली होती. त्याच दिवशी वाल्हेकरवाडी येथेही दोन अल्पवयीन मुलांनी 14 वाहनांची तोडफोड केली. जुलै, ऑगस्ट महिन्यातही काळेवाडी, पिंपरी, चिंचवड या भागात तब्बल सात ठिकाणी वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या.

कासारवाडीत सहा वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिवसभरात कोणीही फिर्याद देण्यास आले नाही. तरीही पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. फिर्यादही दाखल करून घेतली जाणार आहे. लवकरच आरोपी हाती लागतील.