इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

0
141

दि २० मे (पीसीबी ) – इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. इराणची सेमी-अधिकृत वृत्तसंस्था मेहरने ही घोषणा केली. त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री हुसेन अमीराबदुल्लाहियान यांच्या मृत्यूची माहितीही देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष अझरबैजानच्या टेकड्यांमध्ये सापडला होते. यामध्ये अध्यक्ष रईसी यांच्यासह 9 जण होते.

रविवारी संध्याकाळी 7.00 वाजण्याच्या सुमारास अझरबैजानजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. रात्रभर त्याचा शोध सुरू होता. परिसरात मुसळधार पाऊस, धुके आणि थंडीमुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. यादरम्यान तीन बचाव कर्मचारीही बेपत्ता झाले.

अध्यक्ष रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन यांच्याशिवाय, हेलिकॉप्टरमध्ये पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती, तबरीझचे इमाम मोहम्मद अली अलीहाशेम, एक पायलट, सहवैमानिक, क्रू प्रमुख, सुरक्षा प्रमुख आणि अंगरक्षक होते.

शोध मोहिमेत गुंतलेल्या तुर्कीच्या ड्रोनला अझरबैजानच्या टेकड्यांवरील ताविल भागात एक जळलेली जागा दिसली. इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा हा मलबाअसावा, असा संशय आला.

इराणचे राज्य माध्यम IRNA नुसार, रईसी 19 मे रोजी सकाळी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. परतत असताना अझरबैजानच्या सीमेजवळ इराणमधील वर्जेघन शहरात हा अपघात झाला.

अल्जझीरा या इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार, पूर्व अझरबैजानमधील इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर असगर अब्बासगोलिजादेह यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आणि क्रू सदस्याच्या फोनवरून सिग्नल मिळाले होते. सिग्नलच्या आधारे आम्ही सुरक्षा दलांसह त्या ठिकाणाकडे जात आहोत.

तत्पूर्वी, राष्ट्रपतींचे कार्यकारी कामकाजाचे डेप्युटी मोहसीन मन्सौरी यांनी हेलिकॉप्टरमधील एक अधिकारी आणि क्रू मेंबर यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा केला होता. शोधकार्यात गुंतलेल्या बचाव पथकाला अपघातग्रस्त हेलिकॉप्टर सापडल्याचे सरकारी टेलिव्हिजनने वृत्त दिले आहे. मात्र, इराणी रेड क्रिसेंटने हे दावे फेटाळून लावले आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे – इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या बातमीने मी चिंतेत आहे. या कठीण काळात आम्ही इराणसोबत आहोत.