इंदापूर तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला

0
69

इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी संविधान चौकात हा हल्ला केला. शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदारांची गाडी आली असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. सोबत हल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती. ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तहसीलदार श्रीकांत पाटील यांचमया गाडीच्या काचा फुटल्या. सुदैवाने तहसीलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आलेले आहे.

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही.

शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे, हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसांना चिरडणारे आपल्या विभागाच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.