आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदी डॉ. भावार्थ देखणे

216

आळंदी, दि. २१ (पीसीबी) : आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदाच्या रिक्त सहा जागांसाठी इच्छुक अर्जदारांच्या मुलाखती होऊन तीन जणांची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यात डॉ. भावार्थ देखणे, अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ गुरू शांतीनाथ या तिघांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी या नेमणुकांबाबत आदेश दिला. ही नेमणूक सात वर्षांसाठी असेल. कार्तिकी वारी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याने नवीन विश्वस्त कोण याचीच उत्सुकता होती. दरम्यान, जिल्हा सत्र न्यायाधीश पुणे येथील जिल्हा न्यायालयाकडून ऑक्टोबर महिन्यात मुलाखती झाल्या. जिल्हा न्यायाधीश शाम चांडक आणि त्यांचे अन्य दोन सहकारी न्यायाधिशांनी मुलाखती घेतल्या होत्या. आळंदी देवस्थानमध्ये विश्वस्त पदाच्या सहा जागा मे महिन्यात रिक्त झाल्या होत्या. जवळपास सव्वाशे लोकांनी सहा जागांसाठी अर्ज केले होते. त्यातून केवळ तीन जागांवरच नेमणुका झाल्या.