आळंदीत तरुणावर चाकूने वार

246

आळंदी, दि. ३ (पीसीबी) – टेम्पो फोडू नका असे म्हटल्याने तिघांनी एका तरुणाला मारहाण करून चाकूने वार करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 30) रात्री तापकीर नगर आळंदी येथे घडली.

शाम माणिक खंदारे (वय 25, रा. तापकीर नगर, देहूफाटा, आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश प्रकाश पोद्दार (वय 25) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी बुधवारी रात्री त्यांचा टेम्पो (एम एच 14 / एच यु 4695) घराजवळ पार्क केला. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता आरोपी टेम्पो जवळ आले. आरोपी दगडाने टेम्पोची तोडफोड करत असताना फिर्यादींनी आरोपींना टेम्पो फोडू नका असे म्हटले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्याने मारहाण केली. आरोपी ऋषिकेश याने चाकूने वार करून फिर्यादीला जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.