आर्थिक विवंचनेतून एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
500

काळेवाडी, दि. 8 (पीसीबी):- मित्राला व्यवसायासाठी उसने आणि व्याजाने पैसे घेऊन दिले. मात्र मित्राने ते वेळेवर परत केले नाहीत. उलट पैसे देणाऱ्या मित्रांसोबत भांडण करून मानसिक व आर्थिक त्रास दिला. यामुळे पैसे देणाऱ्या मित्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. ५) सकाळी तापकीरनगर, काळेवाडी येथे घडली.

दौलतराम भानुदास वाघ (रा. काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मित्राचे नाव आहे. याप्रकरणी दौलतराम यांच्या पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात रविवारी (दि. ७) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संदीप भिकचंद बागमार (वय ४५, रा. थेरगाव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलतराम आणि आरोपी संदीप हे मागील सात वर्षांपासून मित्र होते. दौलतराम यांनी संदीप याला व्यवसायासाठी उसने आणि व्याजाने पैसे घेऊन दिले. मात्र संदीप याने ते पैसे दौलतराम यांना वेळेवर परत दिले नाहीत. दरम्यान, दौलतराम यांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्यांनी पैशांसाठी तगादा लावला. दरम्यान, संदीप याने दौलतराम यांच्यासोबत भांडण करून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास दिला. त्यातून दौलतराम यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.