शिवरायांचे हे लोकोत्तर युगपुरुष – राजेंद्र घावटे

0
129

निगडी, दि. २० (पीसीबी): “स्वत्व आणि स्वाभिमान यांची पेरणी करत छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये रयतेचे राज्य निर्माण केले. जनतेला अन्याय, अत्याचार, अनाचार यापासून मुक्त करत लोककल्याणकारी राज्याची स्थापना केली. वर्षानुवर्षे येणाऱ्या आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार केला… शिवरायांच्या कार्यामुळे आणि प्रेरणेमुळे पराभूत मानसिकता बदलली. इतिहासाच्या प्रवाहाची दिशा बदलली. प्रतिकूल परिस्थितीत स्वकीयांचं राज्य निर्माण केले . म्हणून शिवाजी महाराज हे लोकोत्तर युगपुरुष आहेत .” असे प्रतिपादन शिवव्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले.

दुर्गा टेकडीवरील सर्वोच्च ठिकाणी असलेल्या सुप्रभात योग मंदिर या ठिकाणी आयोजित शिवजयंती कार्यक्रमात घावटे यांचे “युगप्रवर्तक छत्रपती शिवराय” या विषयावर व्याख्यान झाले. सुप्रभात मित्र मंडळ व सूर्यनमस्कार ग्रुप च्या वतीने सूर्योदयाला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सावरकर मंडळाचे भास्कर रिकामे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते..डॉ. अनिल जांभळे , रवींद्र मोहिते, विलास कुऱ्हाडे, भगवान पठारे, देविदास ढमे, सुरेंद्र अगरवाल, कृष्णा साळवी, बाबा नायकवडी, कांशीराम भोसले, शंकर राणे, विजय शिंदे, सुरेश मुळूक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र मोहिते यांनी केले. शाहीर त्र्यंबक गायकवाड यांनी विरश्रीपूर्ण पोवाडा सादर केला…

राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, “स्वराज्य हे राजमाता जिजाऊ यांच्या निर्धाराचं प्रतीक आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांचा इतिहास हा शक्तीचा, भक्तीचा, युक्तीचा असून अतुलनीय शौर्याचा आणि धैर्याचा आहे. जगात अनेक शूर पराक्रमी राजे होऊन गेले. परंतु लोककल्याणकारी राज्ये क्वचित निर्माण झाली . शिवरायांनी रयतेच्या राज्याची स्थापना करून लोकशाही व्यवस्थेचा पाया रचला.लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. महाराजांनंतर स्वराज्य अनेक वर्षे टिकले. दिल्लीसह देशाच्या बहुसंख्य भाग पुढील काळात मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. शिवरायांच्या चरित्रातून अनेक महापुरुषांनी प्रेरणा घेतली. शिवचरित्रामध्ये भारतवर्षाचे अखंड मार्गदर्शन करण्याची ताकद आहे.” असे सांगत त्यांनी शिवचरित्रातील अनेक प्रसंग सांगितले.

संपतराव शिंदे यांनी सूत्रसंचालन केले….. तर शंकर राणे यांनी आभारप्रदर्शन केले.
सुप्रभात मित्र मंडळ , सूर्यनमस्कार संघ व रोज सकाळी टेकडीवर येणारे नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होतें.