आयुक्तपदाचा ‘चार्ज’ अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांच्याकडे

0
265

पिंपरी (पीसीबी) दि.16- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह दुबई दौ-यावर गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांच्याकडे 22 जानेवारी पर्यंत आयुक्तपदाचा चार्ज देण्यात आला आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्याबरोबर अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी दौऱ्यात आहेत.

हा दुबई दौरा आज (सोमवार) पासून रविवार (दि.22) पर्यंत असणार आहे. आयुक्तांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांनी राजकीय शिष्टाचार व आपत्ती व्यवस्थापन विषयक महत्वाच्या बाबींचे कामकाज पहावे. या कालावधीत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेवू नयेत. या कालावधीमध्ये घेतलेल्या कामकाजाचा अहवाल अलहिदा माझ्या अवलोकनार्थ सादर करावा, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

कशासाठी आहे दुबई दौरा?

मुंबई, नवी दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे सिटी सेंटर बांधण्यात येणार आहे. महापालिकेस भरीव स्वरुपाचे आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर सिटी सेंटर बांधण्याचे पालिकेचे नियोजन आहे. सिटी सेंटरमध्ये कार्यालये, हॉटेल, करमणूक केंद्र, व्यापारी गाळे, बहुउद्देशीय हॉल, वाहनतळ आदी सुविधा असणार आहेत.

नवी दिल्लीतील हेबिहाट सेंटर, मुंबईतील माइन्स स्पेस मालाड आणि बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्‍स, हुस्टन सिटी अमेरिका, दुबई धर्तीवर हे सेंटर उभारले जाणार आहे. दुबईमध्ये अत्याधुनिक पध्दतीने सिटी सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यामुळे आयुक्तांनी दुबईतील सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे नियोजन केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.