`आयत्या बिळावर नागोबा`, नेत्र रुग्णालय उद्घाटनाचे निमित्ताने राष्ट्रवादीचे भाजपवर शरसंधान

21

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्वी केलेल्या विकास प्रकल्पांचीच उदाघटने आता भाजपचे नेते करतात आणि स्वतःच्या नावाची टीमकी वाजवतात, अशी खरमरीत टीका वारंवार होते. मासुळकर कॉलनीमध्ये चार वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन उद्या सकाळी अकरा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याने त्याचाही खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी घेतला आहे.

`आयत्या बिळावर नागोबा, पहायला उद्या सकाळी ११ वाजता या`, अशा आशयाचे चित्र काढून भाजपला टार्गेट करण्यासाठी ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. मासुळकर कॉलनी मधील नेत्र रुग्णालयाचे भूमिपुजन २०१६ मध्ये तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक नगरसेवक म्हणून समिर मासुळकर आणि मंदाकिनी ठाकरे यांनी त्यासाठी विशेष पाठपुरावा केला.

२०१७ मध्ये मासुळकर यांच्यासह डॉ. वैशाली घोडेकर, राहुल भोसले आणि गीता मंचरकर असे राष्ट्रवादीचे पॅनल या प्रभागातून विजयी झाले. १०० खाटांच्या सुमारे २५ कोटी रुपयेंच्या या रुग्णालय लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केले. चार वर्षांपूर्वीच ते बांधून पूर्ण झाले, पण उद्याटनाअभावी खुले नव्हते. २०१९-२० मध्ये कोरोना काळात त्याचा वापर सुरू केला. कोरोना काळात सलग दोन वर्षे लसिकरणाची मोठी मोहिम याच रुग्णालयात सुरू होती. नंतरच्या काळात त्याचा वापर बंद करण्यात आला.

आता पुन्हा स्वतंत्र नेत्र रुग्णालय म्हणून ते लोकांसाठी खुले होणार असून त्याचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तोच धागा पकडून श्रेय लाटणाऱ्या भाजपवर राष्ट्रवादीने कुरघोडी केली आणि `आयत्या बिळावर नागोबा` चे सोशल मीडिया कॅम्पेन राबविल्याने खळबळ आहे.
शहरात यापूर्वी बांधून तयार झालेल्या निगडी उड्डाण पुलाचे उद्घाटनसुध्दा प्रथम राष्ट्रवादीने केले आणि नंतर पुन्हा भाजप नेत्यांनी फित कापली. पिंपळे सौदागर येथील उड्डाण पुलाचे उद्घाटनालासुध्दा भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा वाद उफाळून आला होता.