…आता लोक त्यांची जोड्याने पूजा करतील; रामदास कदमांच्या घणाघाती टीकेवर भास्कर जाधव यांचा टोला

132

रत्नागिरी, दि. १९ (पीसीबी) : शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. रामदास कदम यांनी जी भाषा वापरली ती अजून कुणी वापरलेली नाही. कदम यांची भाषा जसजशी महाराष्ट्रात जाईल तस तसे लोक त्यांची जोड्याने पूजा करतील. कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. मुंबईतील शौचालयांमध्ये जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांनी ओकली आहे, असं सांगतानाच माझे वडील गेल्यानंतर अनेक नेते मला भेटायला आले. गिते, तटकरे, मुश्रीफ आले. त्यांच्या मी पाया पडलो. रामदास कदम यांच्याही पाया पडलो. त्याचा अर्थ त्यांनी वेगळा काढला. त्यांना काही वैचारिक पातळी आहे की नाही? रामदास कदमांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर हल्ला चढवला. रामदास कदम यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे शिंदे यांनी त्यांना तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे. ज्या बाळासाहेबांच्या कुटुंबाचा फोटो घरात लावतात, त्याच कुटुंबावर कदम टीका करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ दूर केलं पाहिजे. नाही तर हा माणूस काही तरी अघटीत घडवून आणेल, असं भास्कर जाधव म्हणाले.

शरद पवार यांचा मी झालो की नाही हे शरद पवार ठरवतील. महाविकास आघाडी तोडा हे कधी सांगायला गेला? असा सवाल करतानाच रामदास कदम माझ्याकडे आले होते. मला कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. त्यामुळे मला विरोध करू नको. परब यांना मला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला सांग, अशी विनवणी रामदास कदमांनी मला केली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

तुमच्या व्यासपीठावर भाजपची माणसं होती. त्यांच्यासमोर तुम्ही उद्धव ठाकरेंवर टीका केली. केवळ नैराश्यापोटी तुम्ही टीका केली. तुम्ही उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर बहुतांश महिला सभेतून उठून गेल्या, असं ते म्हणाले.

रामदास कदम यांच्या विधानामुळे त्यांच्या मुलाच्या राजकीय जीवनाची माती झाली आहे. कदम यांना नशिबाने साथ दिली. म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं. तरीही ते शिवसेनेवर बोलत आहेत. कदम वाह्यात बडबडले. रड्याचं नाटकही त्यांनी केलं, अशी टीकाही त्यांनी केली.