आताचे शाहू महाराज हे खरे वारसदार नव्हेत, तेसुध्दा दत्तक

0
158

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलं आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूर्वगामी विचार जपला. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? असा सवाल संजय मंडलिक यांनी केला. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी संबंधित वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण तापू लागलं आहे.

“मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मरायाची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? आता जे महाराज साहेब आहेत ते कोल्हापूरचे आहेत का? खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आले आहेत. ते खरे वारसदार नाहीत. खरे वारसदार तुम्ही, आम्ही आहोत. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आपण जपले. ही भूमी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आहे. शाहू महाराजांची आपल्याला पुरोगामी विचार शिकवला. समतेचा विचार शिकवला. या हवेत, पाण्यात गुण आहेत की या जिल्ह्यातील नागरिकांना जन्मत: शाहू विचार आहेत”, असं संजय मंडलिक म्हणाले.

संजय मंडलिक यांच्या विधानावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “संजय मंडलिक यांचा हेतू हा छत्रपती घराण्याचा अपमान करण्याचा नक्कीच नसावा. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती वंशाचा पुरावा मागितला होता हे विसरलात का? भाजपने छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा दिली तेव्हा स्वत: शरद पवारांचं वक्तव्य वादग्रस्त नव्हतं का? आधी छत्रपती हे पेशव्यांची नेमणूक करायचे आणि आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करत आहेत. हा छत्रपती घराण्याचा पवारांनी केलेला अपमान होता ना? तेव्हा उगाच राजकीय विषय नसल्याने अशा विषयांना मोठ करण्याचा हेतू आहे”, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.