आढळरावांना पराभव दिसला म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा – डॉ. अमोल कोल्हे

0
67

शिरुर – शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा माहोल चांगलाच तापला आहे. कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनकडून नोटीसा दिल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत प्रचाराची दिशा बिघडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच गावात आढळरावांच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहण्यापासून नोटीस देऊन परावृत्त करण्यात आले आहे. यावर बोलताना डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना चांगलेच सुनावले आहे.

विरोधी उमेदवार खासदार असताना त्यांनी जे शिरुर तालुक्यातील करंदी गाव दत्तक घेतले होते, त्याच गावातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस देऊन दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण आढळराव पाटील यांचा प्रचार दौरा त्या गावात येत असताना विरोधी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये म्हणून नोटीस दिल्या जातात. मी देखील करंदी गावात प्रचारदरम्यान गेलो होतो एका कार्यकर्त्याने मला प्रश्न विचारला होता त्याच्या प्रश्नाचे उत्तर आणि त्याच्या शंकांचे निरसन होईल अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने मी त्याचे समाधान केले होते. परंतु विरोधी उमेदवाराला कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली. जे करंदी गाव आपण दत्तक घेतले त्याच दत्तक गावातील लोकांना अशा प्रकारे दडपशाही करून नोटिसा पाठवण्याची वेळ येत असेल तर त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. हे स्पष्ट दिसून येत आहे. असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान करंदी (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच बबन उर्फ बबलू ढोकले, जावेद इनामदार, योगेश ढोकले, सागर झेंडे यांना पोलसांनी नोटीस करंदीत होणाऱ्या आढळराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहू नये म्हणून परावृत्त केले. परंतु यावर वरील नोटीस मिळालेल्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही कोणतेही प्रश्न आढळराव यांना विचारणार नव्हतो किंवा ते आमच्या गावात येणार आहेत याची कोणतीही कल्पना नव्हती. याशिवाय अशा दडपशाहीच्या प्रकारामुळे आढळराव पाटील यांचा पराभव ठरलेला आहे.