आज सायंकाळी सांगवीत नृत्य साधना समर्पण कार्यक्रम

0
157

सांगवी, दि. १८ (पीसीबी) – नृत्य क्षेत्रात गेली आठ वर्षे सतत परिश्रम घेतलेल्या बारा ते तेरा वर्षांच्या मुली त्यांच्या साधनेची जाहीर प्रस्तुती शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगवी येथील निलू फुले रंगमंचावर करणार आहेत. वेळ सायं.५ ते ८.

कु. शर्वरी मुळूक, कु. चिन्मयी देशमुख आणि कु. अवनी कुलकर्णी या सुकन्या वयाच्या पाचव्या वर्षा पासून त्यांच्या गुरु सुश्री मौसम मेहता यांच्या ब्लॉसम अकादमीत भरतनाट्यम या नृत्य प्रकारात सातत्याने प्रशिक्षण घेत आहेत. त्यांची नृत्य सेवा आता परिपक्व झाली आहे. त्या प्रीत्यर्थ आपल्या सेवा समर्पणाचा ‘अरंगेत्रम्’ हा कार्यक्रम त्या आता सादर करीत आहेत.

शास्त्रीय नृत्य प्रकारात ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले त्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्य प्रशिक्षिका, कला गुरु सुश्री अंजली बागल (मोक्ष नृत्य प्रशिक्षण विद्यालय) आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कथ्थक नृत्य शैलीत शीर्षस्थानी असलेल्या विदुषी गुरु सुश्री शमा भाटे, गुरु सुश्री सूरिंदर सायान (प्राचार्या, ब्ब्लुरिज स्कूल, हिंजवडी), सुश्री अंजली भागवत (विख्यात नेमबाजपटू, अर्जुन अवॉर्ड विजेत्या) आणि श्री मिनिनाथ दंडवते (महापालिका सहाय्यक आयुक्त) कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. रसिकांनी या बहारदार नृत्य कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ब्लॉसम् अकादमीच्या प्रमुख गुरु सुश्री मौसम मेहता यांनी केले आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.