आकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी

69

आकुर्डी, दि.१९ (पीसीबी) – : कोरोनाकाळानंतर २ वर्षांनी यंदा आषाढी पालखी सोहळा होणार असल्याने आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांच्या स्वागताची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे.तसेच सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हजारो वारकऱ्यांसमवेत शहरात दाखल होतो.

हा पालखी सोहळा परंपरेनुसार आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असतो. आकुर्डीतील विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट हे वतनवारी पद्धतीने कुटे कुटुंबीयांकडे आहे. हे शिवकालीन मंदिर असल्याचे सांगितले जाते.संत तुकाराम महाराज पायी वारी करत त्यावेळी पहिला मुक्काम येथील विठ्ठल मंदिरात करत असत. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या या मुक्कामास ऐतिहासिक परंपरा आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहर पसिरातील सर्व नागरिकांचा सहभाग असतो.पालखी आल्यानंतर सायंकाळी ७ वाजता समाजआरती केली जाते. त्यांनंतर रात्री ११ वाजता आरती, पहाटे ४ वाजता आयुक्त राजेश पाटील,विश्वस्त गोपाळ कुटे यांच्या हस्ते अभिषेक व आरती होईल. त्यानंतर पहाटे विठ्ठल-रूक्मिणीची महापूजा करून पालखी मार्गस्थ होते. पालखी सोहळा आमगनापासून ते मार्गस्थ होईपर्यंत पालिकेकडून आकुर्डी परिसरात सलग पाणी पुरवठा केला जाणार आहे. दरवर्षी कुटे कुटुंबीयांकडून वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.

पालखी सोहळ्यासाठी महापालिकेकडून मंदिर व परिसराची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या शेजारी मोठे शेड बांधले आहे. त्यामध्ये दर्शनरांग तयार केली आहे. तसेच स्वतंत्र खोल्यांची देखील व्यवस्था आहे. वारकरी दरवर्षी ठरल्याप्रमाणे ओळखीच्या घरी विसावा घेतात. शहरवासीय देखील वारकऱ्यांचे पाहुण्यांप्रमाणे प्रेमभावाने आदरातिथ्य करतात. तसेच नेहमीप्रमाणे मनपा शाळांमध्ये देखील काही वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.सोहळ्यादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिरामध्ये ३२ सीसीटीव्ह कॅमेरे लावण्यात आले आहेत. महापालिकेकडून यासाठी १ व्हॅन देण्यात आली आहे. ज्यामध्ये मंदिर परिसरात लावलेल्या कॅमेऱ्यांचे फुटेज दिसणार आहे.

महापालिकेच्या वतीने वारक-यांच्या सेवेसाठी आणि आपत्कालीन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मुख्य कंट्रोल रूमची उभारण्यात येणार आहे.पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी सोहळा ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून जाणार आहे त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन, विद्युत, पाणीपुरवठा, स्थापत्य तसेच आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी ग्रुप कमांडर टीमसोबत समन्वय राखून आपत्कालीन नियंत्रण कक्षाकरिता आवश्यकता असल्यास मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत.पालखी सोहळा ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून जाणार आहे त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या धडक कारवाई पथकातील अधिकारी, कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या जवानांचा या कामात आवश्यकतेनुसार समावेश करण्यात येणार आहे.पालखी सोहळ्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले आहे. यंदाची वारी निर्मलवारी आणि प्लास्टिकमुक्त वारी व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून प्रत्येकाने यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.