अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…! राज ठाकरे यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

0
44

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. राज्यात महायुतीनी निकालात मोठी मुसंडी मारली आहे. महायुतीला 220 पेक्षाही जास्त जागांवर यश मिळताना दिसत आहे. महायुतीचा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजय आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. एकीकडे महायुतीचे यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विरोधी पक्षनेते पदासाठी प्रत्येकी 29 आमदारांचा आकडा देखील पार करता आलेला नाही. महाविकास आघाडीला 50 पेक्षाही कमी जागांवर यश मिळताना दिसतोय. त्यामुळे हा निकाल धक्कादायक असल्याची जनतेमध्ये भावना आहे. या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेला खातं देखील उघडता आलेलं नाही. याउलट मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे राजेश मोरे यांचा विजय झाला आहे. मनसेला कुठेच यश मिळालेलं नाही. या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर अवघ्या तीन अक्षरांत प्रतिक्रिया दिली आहे. “अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अतिशय अविश्वसनीय असाच लागला आहे. कारण महायुतीला तब्बल 231 जागांवर यश मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या मातब्बर नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख, यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अवघ्या 152 मतांनी जिंकून आले आहेत. तसेच विजय वडेट्टीवार हे देखील फार कमी मतांच्या फरकाने जिंकून आले आहेत. या निवडणुकीत भाजपने तब्बल 130 पेक्षा जास्त जागांवर मुसंडी मारली आहे. तर शिंदे गटाला देखील 55 पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत. तसेच अजित पवार गटाला देखील 40 पेक्षा जास्त जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 15 आणि शरद पवार गटाला 10 जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं चित्र आहे.