अबब… 390 कोटींची घबाड -58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने

67

 जालना, दि. ११ (पीसीबी) – राज्यात सर्वाधिक लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरं, कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. विभागाने केलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. त्यात 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज तसेच सुमारे 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यात औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी पथकाला तब्बल 13 तास लागले. 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहोचले होते. जालन्यात मिळालेली ही राेकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन माेजण्यात आली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली माेजणी रात्री 1 वाजता पूर्ण झाली.

एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांची कारवाई –
आयकर विभागाच्या औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत. याचा प्राप्तिकर बुडवल्याचा संशय होता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदार आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले. एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली.

कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड –
आयकर विभागाला या कारवाईत सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यामुळे या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. तेथे कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली.

बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त –
जालन्याच्या या चारही स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे मिळाले. सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे. आयकर विभागाने या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यांसह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. एकूण सुमारे 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा पथकाने केला आहे.