अन्यथा ओला कचरा उचलला नाही तर तो महापालिका भवना समोर आणून टाकणार

296

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हाउसिंग सोसायट्यांच्या अडचणी, मागण्या व विनंती समजून घेऊन मार्ग काढल्यानंतरच मोठ्या सोसायट्यांकडून ओला कचरा घेणे बंद करावे. अन्यथा कोणत्याही सोसायटीमधील ओला कचरा उचलणे बंद केल्यास चिखली, मोशी हाऊसिंग फेडरेशन सर्व ओला कचरा पिंपरी-चिंचवड मनपाच्या समोर आणून टाकणार, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील सहा हजार हाऊसिंग सोसायट्या आता या मुद्यावर एक झाल्या असून हा मुद्दा कळीचा ठरत आहे.

याबाबतचे सविस्तर पत्र चिखली-मोशी हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी मनपा आयुक्त यांना ईमेलद्वारे पाठवले आले आहे. अशी माहिती सांगळे यांनी दिली. ‘प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियानां’तर्गत 2016 पासून मोठ्या प्रमाणात ओला कचरा उत्पन्न करणाऱ्या संस्थांना घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या संस्थेने कचरा स्वतःच जिरवायचा आहे. याबाबत पिंपरी चिंचवड मनपाने गृह प्रकल्पांच्या विकासकाला (बिल्डरला) त्यांचा गृहप्रकल्प करताना काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत.

2016 पासून असे मोठे गृह प्रकल्प ज्या विकसकाने विकसित केलेले आहेत, त्यांनी त्यांच्या गृहप्रकल्पात ओला कचरा विघटन प्रकल्प उभारणे अनिवार्य केलेले आहे. असे ओला कचरा विघटनाचे प्रकल्प जर त्या विकसकानी त्यांच्या गृह प्रकल्पात उभारले नसतील, तर त्यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणार नाही, अशी अट असताना देखील मनपाच्या बांधकाम विभागाने त्यांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत. या सर्व कर्तव्यात कसूर केलेल्या मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फेडरेशनने केलेली आहे. तसेच, या विकसकांनी नियम व अटींचा भंग केला म्हणून त्यांच्यावर दंड ठोठवावा व त्वरित हे प्रकल्प उभारण्याचे त्यांना आदेश द्यावेत.