अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत मोठा निर्णय

84

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – महाविकासआघाडी सरकारला मुंबई उच्च न्यायालयाकडून आज मोठा धक्का बसला आहे. कारण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना आगामी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करू देण्याची अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मतदानासाठी काही तास विधानभवनात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. मात्र न्यायालयाने परवानगी नाकारल्याने आता या दोघांना राज्यसभा निवडणुकी पाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीतही मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे विधानसभेत 53 आमदार आहेत. आता यातील दोघांना मतदान करण्यास परवानगी नसल्याने एकूण आमदार 51 उरले आहेत. विधानसभेतील 288 पैकी 285 आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठीचा कोटा आता 26 वर आला आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 26 मते हवी आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे असे दोघे जण रिंगणात आहेत. राष्ट्रवादीला आता आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी एका मताची गरज पडणार आहे. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.