“अध्यात्म देशविघातक शक्तींना प्रतिबंध करू शकते!” – ॲड. सतिश गोरडे

0
42

पिंपरी (दिनांक : १६ सप्टेंबर २०२४) “हिंदूंचे अध्यात्म हे देशविघातक शक्तींना प्रतिबंध करू शकते!” असे विचार विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी श्री क्षेत्र खंडेश्वर देवस्थान, मुक्काम पोस्ट आपधूप, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे रविवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना षष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रखंड सत्यापन आणि एकत्रीकरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ॲड. सतिश गोरडे बोलत होते. याप्रसंगी धर्माचार्य ह. भ. प. रामदासमहाराज क्षीरसागर, प्रांत गोरक्षा सहप्रमुख विलास फाटक, विठ्ठल मुरकेकर, विभाग मंत्री प्रा. सुनील खिस्ती, जिल्हा सहमंत्री शरद नगरकर, विभाग मंदिर अर्चक संपर्क प्रमुख ॲड. जयदीप देशपांडे, विधी प्रकोष्ट ॲड. संकेत राव, प्रखंड मंत्री संतोष गवळी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, “विश्व हिंदू परिषदेच्या वेगवेगळ्या अभियानांतर्गत हिंदू समाजातील अनिष्ट रूढी – परंपरा यांचे निर्मूलन करून संपूर्ण हिंदू समाजाला ज्ञानसंपन्न, कर्तृत्ववान, निर्दोष अन् शोषणमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वास्तविक हिंदूंच्या अध्यात्मातील तत्त्वज्ञान खूप श्रेष्ठ असूनही केवळ अज्ञानातून त्याचे आचरण करण्यात आले नाही. तसेच आपापसातील भेदभावाने अनेक पारंपरिक व्यवसाय हिंदूंच्या हातून गेले आहेत. देशविघातक शक्तींचे आव्हान उभे ठाकले आहे. यासाठी सकल हिंदू समाजाने एकत्र येऊन आणि हिंदुत्व जोपासून आपले सत्त्व आणि स्वाभिमान अबाधित ठेवावे यासाठी विश्व हिंदू परिषद कटिबद्ध आहे!” ह. भ. प. रामदासमहाराज क्षीरसागर यांनी आशीर्वचनपर मनोगतातून हिंदू धर्म जगातील एक सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे प्रतिपादन विविध संदर्भ उद्धृत करून सांगितले. विलास फाटक यांनी गोरक्षण आणि गोसंवर्धन याबाबत विश्व हिंदू परिषदेने केलेल्या कार्याविषयी माहिती दिली; तर सुनील खिस्ती यांनी परिषदेच्या विविध उपक्रमांची सविस्तर ओळख आपल्या मनोगतातून करून दिली.

यावेळी प्रखंड अध्यक्षपदी रावसाहेब धुरपते, उपाध्यक्षपदी काशिनाथ फंड, प्रखंड मंत्रीपदी संतोष गवळी, बजरंग दल प्रखंड गोरक्षा प्रमुखपदी मंगेश शिंदे तसेच शुभम पिंपरकर यांची नियुक्ती करून त्यांना सन्मानित करण्यात आले. ॲड. संकेत राव यांनी स्वागत केले. विकी पुजारी आणि संतोष गवळी यांनी संयोजन केले. शरद नगरकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.