अजित पवार यांची भूमिका लोकांना आवडली नाही

0
145

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मी बोलत असलो तरी सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलणार नाही. कारण त्या राजकारणात नव्हत्या. समाजकारणात काम करत होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार अशीच होणार आहे. अजित पवार यांची भूमिका लोकांना आवडली नाही. अजित पवार यांनी उमेदवार ठरविला आहे. पण, अद्याप जाहीर केला नाही, असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, रोहित पवार यांच्या शहरभेटीमुळे शरद पवार गट राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
मराठा आरक्षणावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के, भाजपच्या काळात १३ टक्के तर आता १० टक्के आरक्षण दिले. मराठा समाजाची २८ टक्के लोकसंख्या असताना १० टक्के आरक्षण का दिले, गायकवाड आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटींवर सरकारने अभ्यास केला नाही.

रोहित पवार म्हणाले, अजित पवारांचा भाजपामध्ये वट आहे, असं वाटत होतं. पण आता असं काही वाटत नाही. कारण त्यांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा वट राहिला नाही. त्यांचा दिल्लीतील संपर्क कमी पडत आहेत. विधानसभेला देखील त्यांना वीस जागा मिळतील किंवा तुम्ही तुमच्या चिन्हावर लढू नका भाजपच्या चिन्हावर लढा, असं सांगितलं जाईल. लढायचं असेल तर वेगवेगळं लढा अशी परिस्थिती होणार आहे. लोकसभेला भाजपाला दोन्ही पक्षांची गरज आहे. तरीही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे महत्व कमी केले जात आहे. लोकसभेनंतर त्यांची किंमत काय होईल ते सांगता येत नाही.

रोहित पवार पुढे म्हणाले, पार्थ पवार यांच्या उमेदवारी बाबत काहीही होऊ शकतं. राज्यसभेत त्यांना उमेदवारी देण्यात येणार होती असं कळलं. लोकसभेला ते उभे राहणार आहेत. शिरूरमध्ये शक्यता कमी आहे. बारामती आणि नगर येथून त्यांना उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. युगेंद्र पवार यांच्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, युगेंद्र काय निर्णय घेतो ते महत्वाचं आहे. तो शरद पवार म्हणजे त्याच्या आजोबांना सहकार्य करत असेल तर चांगली गोष्ट आहे. युगेंद्र हा शरद पवार यांना साथ देत असेल तर त्याचं स्वागत आहे. शरद पवार यांनी अजित पवारांसाठी काय केलं हे आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही. अजित पवार हे काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही.

राज्य मागासवर्ग आयोगाने घाईगडबडीत १५ दिवसांत सर्व्हे केला आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला की काय अशी भीती वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करु सांगितले. प्रयत्न हा शब्द राज्यकर्त्यांना मतदान मिळवून देईल पण सामान्य लोकांसाठी घातक ठरु शकतो. आम्हाला आरक्षणावर सभागृहात बोलायचे होते. पण, बोलू दिले नाही, असेही ते म्हणाले.

आगामी काळात पिंपरी चिंचवड शहरात रोहित पवार हे बारकाईने लक्ष घालणार आहेत. गेली पंचवीस वर्षे शहरात अजित पवार यांची हुकमत चालत होती. पवार कुटुंबातील कोणीही शहरात राजकीय ढवळाढवळ केलेली अजितदादांना चालत नव्हती. सुप्रिया सुळे, रोहित पवार हेसुध्दा शहरात कार्यक्रमासाठी येणे टाळत असतं. आता अजितदादा विरोधात त्यांना ठोस भूमिका घेतल्याने शहरात त्यांचा वावर वाढला आहे.