अजित पवार गटात मोठी फूट पडणार, छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर

0
66

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भुजबळांविषयी हा मोठा दावा केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी. ट्विट करत अंजली दमानियांनी हा दावा केलाय. अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘भुजबळ भाजपच्या वाटेवर….? एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप’ असं लिहिलंय.

मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र अंजली दमानियांचा दावा फेटाळून लावला आहे. पक्षात घुसमट होत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर भाजपकडून कुठलीही ऑफर आली नसल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीही प्रतिक्रिया दिलीय…भुजबळ भाजपच्या संपर्कात नसून, ते कधीही भाजपात येणार नाही असं स्पष्ट केलंय.

छगन भुजबळांसंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही वक्तव्य केलंय. भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी भाजपला चालले मग भुजबळ का नाही चालणार…? असा सवाल विचारत भ्रष्टाचारी भाजपसोबत गेल्यास पवित्र बनतो असा टोला राऊतांनी लगावलाय.

छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केली. शिवसेनेतून त्यांनी नगरसेवक ते मुंबईचं महापौरपद भूषवलं.ओबीसी-मंडल आयोग मुद्द्यावर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्रक केला. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश आणि कॅबिनेटमंत्री बनले. शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य झाले. भुजबळ यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे. आता शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात सामील झालेत. समता परिषदेच्या माध्यमातून लाखोंचा ओबीसी समाज भुजबळांनी जोडलाय.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ओबीसी समाज भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे, याच काळात भुजबळ ओबीसींची वज्रमूठ बांधण्यात यशस्वी झालेत. त्यामुळे भुजबळांचा भाजपला फायदा होऊ शकतो असा अंदाज बांधला जातोय, त्यात दमानियांच्या ट्विटनंतर भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आणखी जोरात सुरु झाल्यात..

दरम्यान, मराठा आरक्षणावरुन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड विरुद्ध छगन भुजबळ असा सामना सुरु आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणा-या भुजबळांना मंत्रिमंडळातून कमरेत लाथ घालून बाहेर काढा अशी बोचरी टीका संजय गायकवाडांनी केली होती. गायकवाडांच्या शेलक्या शब्दातल्या टीकेचा भुजबळांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतलाय. तुम्ही ज्या शिवसेनेत शिकला त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, अशा शब्दांत मंत्री भुजबळांनी गायकवाड यांना इशारा दिलाय.