लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. या टप्प्यांच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर उत्तरं आणि प्रत्युत्तरंही दिली जात आहेत. दिग्गजांच्या मुलाखतीही सुरु आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसत्ता लोकसंवाद मध्ये राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील असं म्हटलं आहे. तसंच अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
“भाजपाला पुन्हा सत्ता मिळणे कठीण असल्याचे विविध राज्यांमधून आढावा घेताना मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले. देशात एकूणच भाजपच्या विरोधात वातावरण अनुभवास येत आहे. महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही. राज्यातील ३२ ते ३५ जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. तसंच अजित पवार गटाबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.
अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे गटाच्या तीन ते चार जागा निवडून येऊ शकतात, असा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे १२ उमेदवार निवडून येण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
अजित पवार हे जुलै २०२३ मध्ये शरद पवारांपासून वेगळे झाले आणि त्यांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिलं आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती आहे. महायुतीने सुनेत्रा पवारांना तिकिट दिलं आहे आणि महाविकास आघाडीने सुप्रिया सुळेंना. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा नणंद भावजयीचा सामना आहे. ज्याकडे अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यातली सूप्त लढत असंही पाहिलं जातं आहे. बारामतीची जागा आम्ही जिंकू असा दावा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांची एकही जागा जिंकून येणार नाही असं म्हटलंय.
‘चारसो पार’चा नारा हा संविधान बदलासाठी आहे, त्यामुळे दलित समाज विशेषत: आंबेडकरी समाज भाजपच्या विरोधात गेला आहे. या वेळी भाजपच्या विरोधात दलित-मुस्लीम एकत्रीकरण झाल्याचे दिसत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एमआयएमबरोबर युती होती, त्यामुळे त्यांना सहा टक्के मते मिळाली होती. या वेळी युती नसल्याने वंचितची मते कमी होतील, असे चव्हाण म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकांची सहानुभूती आहे, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. या निवडणुकीत भाजपच्या विरोधात महागाई, बेरोजगारी, आर्थिक गैरव्यवहार, नैतिक भ्रष्टाचार आणि शेवटचा मुद्दा संविधान बचाव हे मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरत आहेत. विशेष म्हणजे या पाचही मुद्द्यांवर मोदी स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत.