अजित पवारांनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांचे आमदारांच्या हस्ते पुन्हा भूमिपूजन कशासाठी?

0
54

शक्ती प्रदर्शन आणि श्रेयवाद म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या! – राहुल कलाटे

वाकड, दि. 29 (पीसीबी) : रस्ते मंजूरी आणि इतर प्रक्रिया तसेच कामांचे ऑनलाईन उद्घाटन ऑक्टोबरमध्येच पार पडूनही पुन्हा ताथवडे – पुनावळे – वाकड परिसरातील रस्त्यांच्या भूमिपूजनाचा घाट आमदारांनी कशासाठी घातला आहे? या भागाचा विकास व्हावा हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि कामे मार्गी लावण्यासाठी मी स्वतः अनेकदा भूमिका घेतली आहे. पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळेच ऑक्टोबर महिन्यातच या सर्व कामांच्या निविदा निघून ऑनलाईन भूमिपूजनाचा कार्यक्रमही आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पार पडला आहे. तरीसुद्धा आज पुन्हा आमदारांनी या सर्व कामाच्या भूमिपूजनाचा घाट घातला. श्रेयवादाचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रभाग क्रमांक २५ मधील ताथवडे, पूनावळे व वाकडच्या विकासासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून सदैव तत्पर आहे आणि राहील. केवळ निवडणुकीपुरता नाही तर नेहमी मी लोकांसोबत राहत आलो आहे. वास्तविक पाहता ताथवडे, पुनावळे व वाकडमधील अनेक डीपी व सेवा रस्त्यांच्या विकासाबाबत मी स्वतः २०२१ पासून महापालिका प्रशासनांकडे पाठपुरावा केला आहे. वारंवार पत्रव्यवहार व स्मरणपत्रे दिली. महापालिकेचे विविध वरिष्ठ अधिकारी तथा महापालिका आयुक्तांना या भागातील रस्त्यांची पाहणी कारण्यासाठी पाचारण केले होते. या अथक प्रयत्नानंतर अखेर महापालिका प्रशासनाने या भागातील विविध रस्त्यांच्या कामांना मंजुरी देत निवडणुकीपूर्वीच प्रत्यक्षात कामांना सुरुवात केली होती. याची नियविदा प्रक्रिया पूर्ण करून ९ ऑक्टोंबर रोजी राज्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन पद्धतीने नटसम्राट निळू फुले नाट्यगृहातील समारंभात रस्त्यांचे भूमिपूजन केल्याने प्रत्यक्षात कामांना सुरुवातही झाली होती. असे असतानाही नवनिर्वाचित आमदारानी आयत्या पिठावर रेघोट्या ओढत केवळ आणि केवळ कामांचे श्रेय लाटण्यासाठी झालेल्या भूमिपूजनांचे पुन्हा दुसऱ्यांदा भूमिपूजन करण्याचा सपाटा लावला आहे. शहरातील ठराविक भागाला विकासापासून नेहमीच वंचित ठेवणाऱ्यांची ही श्रेयवादाची लढाई हास्यास्पद आहे, असे कलाटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

असा केला पाठपुरावा – राहुल कलाटे
२०२१ पासून या कामाचा मी पाठपुरावा करत आहे. २४ नोव्हेंबर २०२१; २३ फेब्रुवारी २०२४; २७ जुलै २०२४; २६ ऑगस्ट २०२४ असे गेले तीन वर्षांहून अधिक काळ मी या विषयावर काम करत आहे. यापूर्वीही २०१७ पासून हायवे लगतच्या रस्त्यांचा, सब वेचा प्रश्न मांडला आहे. २३ फेब्रुवारीच्या पत्रात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याआधी निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरु करण्याबाबत, २७ जुलै २०२४ रोजी मंजूर रस्ते विकिसित करणेबाबत, २६ ऑगस्ट २०२४ रोजी वाकड, ताथवडे, पुनावळे येथील विकासकामांच्या निविदा स्वीकृत करणेबाबत आणि त्यांनतर सप्टेंबर अखेर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंजूर कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्याची विनंती मी पत्राद्वारे केली आहे. या विषयावर नियमित पाठपुरावादेखील केला आहे. त्यामुळेच ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन उदघाट्न होऊन प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली होती.

विकासकामांचे वास्तव !
प्रभाग २५ मधील महत्वाची डीपी रस्ते स्थायी समोर मंजुरीला असताना दिवंगत आमदार समर्थक व सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेत बहुमताच्या जोरावर ऑगस्ट २०२० मध्ये रस्त्यांच्या विरोधात मतदान करून पुनावळे – ताथवडे भागातील विकासकामे रोखली होती. त्यानंतर मी थेट राज्य सरकारची मंजुरी मिळवत हि कामे मार्गी लावली. गेली अनेक वर्षे तत्कालीन आमदार या भागाकडे फिरकले नाहीत. यापूर्वीच उपमुख्यमंत्र्यांनी उदघाटन करून मार्गी लावलेल्या कामाचे पुन्हा उदघाटन करून महापालिका यंत्रणा नाहक वेठीस धरणे, करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करणे हा नवीन पायंडा आमदार पाडत असतील तर तो निंदनीय आहे.

ताथवडे- पुनावळेत रंगले फ्लेक्स वॉर
बुधवारी सायंकाळी वाकड ताथवडे पुनावळेतील विविध रस्त्यांचे भूमिपूजन नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते होत असल्याचे फ्लेक्स विविध चौका चौकात झळकले. त्यानंतर अवघ्या काही तासातच कलाटे समर्थक देखील सरसावले. जगताप यांच्या फ्लेक्स शेजारीच फ्लेक्स लावून ताथवडे पुनावळेतील रस्त्यांना मंजुरी मिळवून देणाऱ्या राहुलदादा कलाटे यांचे ग्रामस्थांनी आभार मानणारे फलक झळकवले आहेत. त्यामुळे कलाटे-जगताप समर्थकांत रंगलेले फ्लेक्स वॉर चर्चेचा विषय बनला आहे

ह्या रस्त्यांना मिळाली होती मंजुरी
राहुल कलाटे यांच्या अथक पाठपुराव्या नंतर मुंबई-बंगळुरू महामार्गापासून काटे वस्ती : ३० मीटर रुंद, २ किलोमीटर लांब, कोयते वस्ती चौक ते जांबेगाव : १८ मीटर रुंद, १.२५ किलोमीटर लांब, मधुबन हॉटेल ते इंदिरा कॉलेज : २४ मीटर रुंद व २.५० किलोमीटर लांब, ताथवडेतून जीवननगर मार्गे एमटीयू कंपनी रस्ता : १८ मीटर रुंद व ८०० मीटर लांब, बीआरटी रस्त्यापासून पुनावळे गावठाण रस्ता : १८ मीटर रुंद व १२०० मीटर लांब, गायकवाडनगरमधील रस्ता १८ मीटर रुंद व ७६० मीटर लांब; वाकड टीपटॉप हॉटेल ते अटलांटा-२ सोसायटी : १८ मीटर रुंद व ८०० मीटर लांब, अशा रस्त्याना मंजुरी मिळून कामे सुरु झालेली आहेत. पावसाळ्यात या भागातील रस्त्यांच्या दुर्दशेचा प्रश्न गंभीर बनला होता