अजित पवारांचीही कोंडी करण्याची भाजपची रणनीती

0
26

दि . १९ ( पीसीबी ) – भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात आणि बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाचा वचपा काढण्यासाठी भाजपने काँग्रेसमधील नाराजीचा फायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर, महाविकास आघाडीतील विसंवाद भाजपच्या पथ्यावर पडू लागला आहे. भाजपने एकाच वेळी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही मातब्बर नेत्यांना शह देण्यास सुरुवात केली आहे. पवार यांच्या जिल्ह्यात काँग्रेस शुन्यावर आली असून त्याचा फायदा पवार यांना नाही तर भाजपला होतो आहे.

मागील आठवड्यात काँग्रेसचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करीत असताना त्यांनी बिगर हुंड्याचे लग्न केल्याची अस्सल ग्रामीण भाषेमधील मिश्कील टिपण्णी केली होती. जगतापांच्या प्रवेशामुळे निश्चितच सासवड-पुरंदर-हवेलीमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समित्या, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होणार आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार आणि भोर-वेल्हा-मुळशी मतदार संघामधील वजनदार राजकीय नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये डेरेदाखल होत पक्ष बदलला होता. या तालुक्यांमध्येदेखील भाजपला मोठा नेता गळाला लागल्याने आपली ताकद वाढवण्याची संधी प्राप्त झाली. यापूर्वी दौंडमध्ये राहुल कुल यांच्या रूपाने भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे.

इंदापूरमधील नेते हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून भाजपकडे गेले होते. नंतर त्यांनी भाजपसोबत काडीमोड घेत राष्ट्रवादीशी (शरदचंद्र पवार) घरोबा केला. मात्र, त्यांचा हा प्रयोगदेखील फसला. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला. हर्षवर्धन पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आजही उत्तम संबंध आणि संपर्क आहे. भविष्यात त्यांची नवीन समीकरणे जुळू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी गड राखलेला आहे. त्यांनी मतदारसंघावर पकड निर्माण केलेली आहे. तर, बारामती विधानसभा उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांकडे आहे. ते सध्या महायुतीसोबत आहेत. त्यामुळे पर्यायाने भाजपच्या जवळ आहेत.

सुळे यांना आगामी लोकसभा निवडणूक सोपी नसणार, हे तर स्पष्ट आहे. मात्र, आगामी चार वर्षांचा कार्यकाळदेखील विविध विधानसभा मतदारसंघांमधील आंदोलने, नागरीप्रश्न, रस्ते आणि स्थानिक समस्या अशा प्रश्नांवर सुळेंची डोकेदुखी वाढवू शकतो. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या विविध पंचायत समित्या, जिल्हा परिषद जागा, नगर परिषदा, ग्रामपंचायती आणि विशेष म्हणजे, सहकार याविषयी भाजप सजगतेने काम करताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि आघाडीचे प्रमुख घटकपक्ष यांच्याकडे भाजपच्या रणनीतीला पर्याय ठरू शकणारे नियोजन, ‘स्ट्रॅटेजी’ दिसत नाही. भाजपचा वारू रोखायचा असेल तर विरोधी पक्षांना अत्यंत गांभीर्याने आणि अभ्यासपूर्वक रणनीती आखून पुढील वाटचाल करावी लागणार आहे.

भारतीय जनता पक्ष दूरगामी विचार करून राजकीय नियोजन करीत असतो. हा पक्ष कायमच निवडणुकीसाठी सज्ज असतो. राजकारणातले बदलते प्रवाह आणि मतदारांची मानसिकता यांचा अभ्यास करून वारंवार या पक्षाने आपल्या रणनीतीमध्ये कालानुरूप बदल केलेले आहेत. आगामी लोकसभेसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. आगामी लोकसभा निवडणूक २०२९ मध्ये होईल. त्याला अद्याप चार वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे भाजपने या वेळेचा पक्षवाढ आणि मातब्बर नेत्यांच्या मदतीने ताकद वाढविण्यासाठी उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेस पक्षाला लागलेली गळती अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही. संघटनात्मक पातळीवर एवढे नुकसान झाल्यानंतरदेखील काँग्रेसच्या नेतृत्वाला शहाणपण सुचत नसल्याचे हे द्योतक आहे. एकीकडे डावी मंडळीदेखील महाविकास आघाडीच्या बाजूने नॅरेटिव्हच्या युद्धात उतरलेली असताना दुसरीकडे काँग्रेसला मात्र अद्यापही स्वतःला सावरता येत नसल्याचे चित्र आहे. त्याचाच फायदा भाजपकडून उचलला जात आहे.

भाजपने बारामती लोकसभा मतदारासंघाची घेराबंदी करण्यास सुरुवात करून केवळ शरद पवार-सुप्रिया सुळे केवळ यांनाच शह दिलाय असे नव्हे, तर दुसरीकडे अजित पवारांचीदेखील कोंडी करण्याची रणनीती यामागे दिसत असल्याचे जाणवते. लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी सुळे यांची साथ दिली. जगताप यांनीदेखील सुळे यांनाच हात दिला होता. आज हे दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत.