अजितदादांना शह देण्यासाठी आता आमदार रोहित पवार पिंपरी चिंचवड शहरात

0
290

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडचे मैदान मारणार, गेलेली सत्ता मिळविणार अशी शक्यता होती. गेल्या महिन्यांत त्यांचे शहरात जंगी स्वागत झाले, कार्यकर्त्यांचा भरगच्च मेळावा झाला. महापालिकेतील विकासकामांसाठी आयुक्त आशिष शर्मा यांच्या उपस्थितीत तीन तासांची बैठक घेऊन अजितदादांनी झलक दिली. उपमुख्यमंत्री या नात्याने दादांनी लक्ष घालायला सुरवात केल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या पोटात गोळा आला होता. दादांचा वारू सुसाट झाला तर पुढची महापालिका आपली नाही याची एव्हाना कल्पना भाजपला आली होती. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले ३०-४० नगरसेवकसुध्दा अजितदादांकडे तोंड करून बसल्याने शहरात भाजपमध्ये घबराट होती. पुणे शहरातसुध्दा अजितदादांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन चंद्रकांतदादांच्या तोंडाला फेस आणला. अखेर पालकमंत्री पाटील आणि आमदार महेश लांडगे यांनी मिळून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे केले. तिथे फडणवीस यांनी बाजू घेण्याच्या एवजी चिडीचूप राहण्याचा सल्ला दिल्याने कपाळावर हात मारण्याची वेळ आली. कारण अजितदादा हे प्रकऱण थेट मोदी-शाह यांच्याकडे असल्याने फडणवीस यांनी हात वर केले.

या सगळ्या घडामोडीने अजितदादा आणि त्यांच्या सर्व समर्थकांची गाडी वायू वेगात निघाली होती. आता या गाडीला करकचून ब्रेक लागणार आहे, पण तो भाजपमधून नाही तर दादांचे काका शरद पवार यांच्याकडून. कारण पिंपरी चिंचवड शहरात आजवर राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवार असे समिकरण होते आता ते बदलणार आहे. शरद पवार यांनी अगदी जातीने या शहराकडे पहायचे ठरवले आहे. त्यासाठी साहेबांच्या गटाचे शहराध्यक्ष म्हणून तुषार कामठे या माजी नगरसेवकाची शनिवारी नियुक्ती कऱण्यात आली. कामठे हे पूर्वाश्रमिचे भाजपचे नगरसेवक. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबरोबर ते भाजपवासी झाले होते. महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारावर ते तुटून पडले म्हणून त्यांना एकही पद मिळाले नाही. अखेर त्यांनी अजितदादांची पताका खांद्यावर घेतली. दुर्दैव असे की, अजितदादांनीच बंड केले आणि राष्ट्रवादीलाच घेऊन भाजप बरबर पाट लावला. कामठे यांनी काळाची पावले ओळखून शरद पवार यांच्या मागे जायचे ठरवले. दिवंगत आमदार जगताप यांना नडणारे, भाजपची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढणारे, अर्बन स्ट्रीट फूटपाथ ३६ कोटी रुपये प्रति किलोमीटर ने करून कशी लूट केली त्याचा भंडाफोड कऱणारे म्हणून कामठे यांचे नाव झाले.

रोहित पवार यांचा शहर दौरा –
आता त्यांच्या दिमतीला शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार पिंपरी चिंचवडच्या मैदानात उतऱणार आहेत. सोमवारी म्हणजे १८ सप्टेंबरला त्यांचा पिंपरी चिंचवड दौरा आयोजित केला आहे. सकाळी भक्ती शक्ती चौकात त्यांचे आगमन होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रोहीत पवार आपल्या पिंपरी चिंचवड मोहिमेची सुरवात करणार आहेत. तिथे आगत स्वागत झाल्यावर निगडी ते पिंपरी दरम्यान रॅली होईल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन असा कार्यक्रम होईल. नंतर कार्यकर्त्यांशी संवाद होईल. राष्ट्रवादी आघाडीचे सहकारी म्हणून शिवसेना आणि काँग्रेसच्या पक्ष कार्यालयातही रोहित पवार भेट देणार आहेत. आगामी काळात महापालित बैठक आणि विविध प्रश्नांत ते स्वतः लक्ष घालणार आहेत. लोकसभा विशेष अधिवेशन संपल्यावर सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार हेसुध्दा शहर दौरा करणार आहेत. थोडक्यात अजितदादांना त्यांच्या लाडक्या पिंपरी चिंचवड शहरात रोखण्यासाठी आता साहेबांची राष्ट्रवादी बाह्या सरसावून रिंगणार उतरल्याने राजकणातील रंगत वाढणार आहे. पक्ष संघटन मजबूत करणे हेच आमचे ध्येय आहे, कोणाशी स्पर्धा करण्याची प्रश्न नाही, असे नवनियुक्त शहराध्यक्ष तुषार कामठे सांगत असले तरी अजित पवार यांना शह देण्यासाठी रोहित पवार यांचे कार्ड साहेबांनी काढले आहे, असे दिसते. अजितदादांनी शहरात २५ वर्षे कार्यकर्त्यांची फळी निर्माण केल्याने राष्ट्रवादीचे ८०-९० टक्के कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत. त्यामुळे दादांची पाळेमुळे उखडून काढणे रोहित पवार यांना शक्य आहे का याचे उत्तर आगामी काळात मिळेल. अजितदादांची सत्ता खेचून घेणाऱ्यांत आमदार महेश लांडगे आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगतात यांचा सिंहाचा वाटा होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचा अडिच लाख मतांनी पराभव हा अजितदादांच्या जिव्हारी लागला होता. आता एकीकडे शहरांतर्गत भाजपचा सूड उगवायचा आणि दुसरीकडे राष्ट्रवादीत घरातूनच काकांचे आव्हान आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा आणि महापालिका अशी सलग तीन-तीन निवडणुकांना सामोरे जायचे असल्याने अजितदादांची खरी कसोटी आता आहे. अजित पवार विरुध्द रोहित पवार असा सामना पिंपरी चिंचवडकरांना पहायला मिळणार हीच गंमत आहे