अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा शनिवारी ‘कार्यकर्ता संवाद’

68

– निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा – अजित गव्हाणे

पिंपरी, दि. ४(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या भ्रष्ट कारभाराला शहरातील जनता वैतागली असून येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता उलटवून लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ हे ब्रिद वाक्य घेऊन येत्या शनिवारी (दि.6) राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ‘कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली.

या संदर्भात माहिती देण्यासाठी अजित गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोग महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका कधीही घोषित करण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार असून महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व आजी-माजी नगरसेवकांनी केला आहे.

शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी हाच पर्याय असल्याने जनतेचीही आम्हाला साथ मिळत आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणे आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच महाविजयाचा निर्धार शनिवारी होणार्‍या ‘कार्यकर्ता संवाद’ मध्ये केला जाणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. अजितदादा यावेळी कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत .या प्रसंगी शहरातील आजी,माजी आमदार, जेष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात दुपारी ०२:०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या ‘कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही गव्हाणे यांनी केले आहे.