अखेर बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

0
176

मुंबई, दि. २० (पीसीबी) – अखेर बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांच्यासंदर्भात अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या आहेत.

अनिक्षाने आपल्या वडिलांची एका गुन्हेगारी प्रकरणातून सुटका करण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा आरोप आहे. अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानी यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध सुरु होता.

मे २०१९ मध्ये त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. क्रिकेट बेटिंगप्रकरणात अनिल जयसिंघानी यांना अनेकदा अटक करण्यात आलेली आहे. शिर्डीत जयसिंघानी यांच्या मालकीचे एक हॉटेल आहे. अनिल जयसिंघानी यांनी आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या तिकीटावर चारवेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवल्या आहेत. २०२२ मध्ये जयसिंघानी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकलेही होते.