पक्ष आदेशाविरोधात काम, महिला संघटिका अनिता तुतारेंसह 8 जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

0
633

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पक्ष आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह 8 जणांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, बहुतांश माजी नगरसेवकसुध्दा महाआघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या एवजी अपक्ष राहुल कलाटे यांचे काम करत असल्याने आता त्या चार माजी नगरसेवकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी ही कारवाई केली आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष या नात्याने शिवसेनेचा पाठिंबा आहे. परंतु, काही पदाधिकारी पक्ष आदेशाविरोधात काम करत असल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

त्यामध्ये चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवि घटकर यांचा समावेश आहे.