नाना काटे यांच्या विजयासाठी कामाला लागा, बैठकित शिवसेनेचा आदेश

0
206

पिंपरी, दि. १७ (पीसीबी):- चिंचवड विधानसभेची निवडणूक ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीमध्ये कोणतीही पक्षविरोधी कृती सहन केली जाणार नसून पक्षाचा आदेश न मानल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या विजयासाठी कामाला लागा, असे आदेश शिवसेना संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी आज पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत दिले आहेत. आजच्या बैठकीमुळे नाना काटे यांच्या विजयाची जबाबदारी शिवसेनेने स्विकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक सध्या चांगलीच गाजत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या विजयासाठी आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शिवसेनेतील महत्त्वाचा घटक असून या पक्षाने नाना काटे यांना पाठिंबा दिला आहे.

त्यापार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी बैठक घेतली. या बैठकीला महिला संपर्क संघटिका लता पाष्टे, चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर, शहराध्यक्ष सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, चिंचवड विधानसभा प्रमुख तथा माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, माजी शहराध्यक्ष योगेश बाबर, युवा सेनेचे अनिकेत घुले, उपशहर प्रमुख हरीष नखाते, श्रीमंत गिरी यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व संघटकप्रमुख उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सचिन आहिर म्हणाले, ‘राज्यपातळीवर महाविकास आघाडी भक्कमपणे एकत्र उभी आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे हे आपले अधिकृत उमेदवार आहेत. काही अपक्ष आम्हीच उमेदवार असल्याचे भासवून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.’

आपल्या पक्षाची ठाम भूमिका ही नाना काटे यांना विजयी करण्याची असून कोणताही गैरसमज मनात न ठेवता नाना काटे यांच्या विजयासाठी आजपासून सर्वांनी कामाला लागावे, अशा सूचनाही आहिर यांनी यावेळी केल्या.

प्रत्येक शाखेच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचे आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला गद्दारांना आणि त्यांना पाठींबा देणाऱ्यांना धडा शिकवायचा असल्याने नाना काटे यांचा विजय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पक्षाच्या भुमिकेविरोधात कोणीही काम केल्यास अथवा तसे आढळल्यास संबंधितांवर निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

त्यामुळे सर्वांनी मनात कोणताही गैरसमज न बाळगता नाना काटे यांच्या विजयासाठी कटीबद्ध रहावे आणि काटे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करणासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना वजा आदेशच सचिन आहिर यांनी दिले आहेत.

बंडखोरावर कारवाई होणार !

पक्षाची भूमिका ही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याची असतानाही आपल्यातीलच एकाने बंडखोरी केली आहे. त्याचा आता पक्षाशी कोणताही संबंध राहिला नसून त्याच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

त्यामुळे बंडखोर उमेदवाराकडून होणाऱ्या कोणत्याही फसव्या प्रचाराला बळी पडू नका आणि नाना काटे यांच्या पाठिशी ठामपणे उभे रहा, असे आवाहनही आहिर यांनी यावेळी केले.