रॅपिडो विरोधात सर्वोच्च न्यायालयात देखील इंटरवेशन याचिका दाखल करणार : बाबा कांबळे

0
256

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) : रॅपीडो कंपनीने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक थांबवावी, यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने रस्त्यावरची लढाई करून रिक्षा चालकांना न्याय दिला. उच्च न्यायालयात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनने याचिका दाखल करत लाखो रुपये खर्च करून वकिलाची नेमणूक केली. रिक्षा चालकांची बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. मा. न्यायालयाने देखील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी मांडलेल्या मतांची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाची लढाई जिंकल्याचे श्रेय घेत असल्याचा काही रिक्षा संघटनांच्या आरोपांना हे उत्तर असून त्यांना चपराक देखील आहे. सध्या रॅपीडो कंपनीने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनही स्वखर्चाने वकील देऊन इंटरवेशन याचिका दाखल करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली. ३० जानेवारी रोजी दिल्लीत स्वतः उपस्थित राहून रिक्षा चालकांची बाजू मांडून तिथेही लढाई जिंकू, असा विश्वासही बाबा कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे भाजपा आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले जय महाराष्ट्र शिक्षण संघटनेचे अध्यक्ष गुलाब सय्यद वाहतूक सेवा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढोले राष्ट्रवादीचे संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे सावकाश रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भालेराव आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, कायद्याच्या अधीन राहून सनदशीर मार्गाने न्याय मिळवता येतो, हे महाराष्ट्र रिक्षा पंचायतने रॅपीडो कंपनीविरोधातला लढा जिंकून दाखवून दिले आहे. काही बोगस रिक्षा संघटनांनी कायदेशीर मार्ग न निवडता रिक्षा चालकांना संकटात टाकून, गुन्हे दाखल होईपर्यंत चुकीच्या मार्गाने आंदोलन केले. रिक्षा चालकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या चुका झाकून या रिक्षा संघटना महाराष्ट्र रिक्षा पंचायतवर खोटे आरोप करून सर्वसामान्य रिक्षा चालकांची अद्यापही दिशाभूल करत आहेत. रॅपीडो कंपनीविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायतने सहकारी मित्र रिक्षा संघटनांच्या वतीने रस्त्यावरची लढाई करत आंदोलन छेडले. रॅपीडोने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर तिथेही महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनने स्वखर्चाने वकील देत लढाई जिंकली आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनच्या पाठपुराव्यानेच उच्च न्यायालयात यश मिळाले आहे. न्यायालयाने आदेशात दोन्ही संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींची निरीक्षणे महत्वाची मानली असल्याचे नमूद केले आहे. मात्र काही रिक्षा संघटनांना याची माहितीच नसल्याने ते रिक्षा चालकांमध्ये चुकीचा संदेश देत आहेत. रिक्षा चालकांनी अशा रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींच्या भूलथापांना आता तरी बळी पडू नये, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

आनंद तांबे म्हणले सध्या रॅपिडो कंपनीने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत ३० जानेवारी रोजी सुनावणी आहे. रॅपीडो कंपनीविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशन देखील इंटरवेशन याचिका दाखल करणार आहे. स्वखर्चाने वकिलाची नेमणूक करून *महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे स्वतः दिल्लीत उपस्थित राहून रिक्षा चालकांचे म्हणणे मांडणार आहेत. रस्त्यावरची लढाई तसेच उच्च न्यायालयात लढाई जिंकल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात देखील लढाई जिंकू, असा विश्वास देखील आनंद तांबे यांनी व्यक्त केला आहे.