‘पाच वर्षे पाण्याची समस्या सहन केली.. आता चिंचवडची जनताच भाजपला हटवणार !’ – शमीम पठाण

0
184

चिंचवड मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नावर महिलावर्ग एकवटला

पिंपरी, दि. 18 (पीसीबी) : मागील पाच वर्षे चिंचवड मतदार संघातील महिला अपुरा व अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येने वैतागल्या आहेत. पालिकेत भाजपची सत्ता असताना, गेली अनेक वर्षे भाजपचेच आमदार या भागाला लाभलेले असतानाही इथल्या गावठाण भागात आजही पाणीपुरवठ्याची समस्या ‘जैसे थे’ आहे. पाणी ही जीवनावश्यक बाब असून महिलावर्गासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे भाजपच्या भ्रष्ट कारभाराला आता इथल्या महिलाच आता भाजपला हटवतील. या महिलांना निवडणुकीच्या निमित्ताने कारभारी बदलण्याची संधी मिळाली असून आता महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनाच मतं द्या, असे आवाहन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शमीम पठाण यांनी केले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी शुक्रवारी (दि. 18) पवनानगर, चिंचवडगाव परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. पदयात्रेची सांगता कोपरा सभेने झाली. त्यावेळी शमीम पठाण बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, ‘भाजपने केलेल्या चुकीच्या व गलथान कारभारामुळे चिंचवड भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, या समस्येशी काहीही देणंघेणं न ठेवणाऱ्या भाजपला आता इथल्याच महिलांनी धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे. नाना काटे यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्याला निवडून दिल्यानेच हा प्रश्न सुटणार आहे, याची आता नागरिकांना खात्री पटली आहे. म्हणून नाना काटे यांचा विजय निश्चित असल्याची खात्री पठाण यांनी व्यक्त केली.

या कोपरा सभेत राष्ट्रवादीचे प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘मागील काही वर्षांपासून चिंचवड मतदारसंघात प्रलंबित राहिलेले प्रश्न, भाजपकडून होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार, नागरिकांच्या समस्यांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे वैतागलेल्या चिंचवडकरांना आता स्वच्छ, पारदर्शक कारभाराची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या रूपाने एक स्वच्छ चारित्र्याचा, विकासाभिमुख आणि दूरदर्शी नेता लाभल्याने त्यांच्याच हाती चिंचवड मतदारसंघ सोपविण्याचा निर्धार करून काटे यांनाच विजयी करण्याचा एकमुखी ठरावच चिंचवडवासीयांनी केला. म्हणूनच नाना काटे यांच्या प्रचार रॅलीत नागरिकांनी प्रचंड संख्येने सहभाग घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला.’

यावेळी चिंचवड मतदारसंघातील सर्व समस्या संपवून येथील सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नाना काटे यांनी नागरिकांना दिली. उपस्थित लोकांची आपुलकीने चौकशी करत त्यांच्याशी विविध अडचणींवर काटे यांनी चर्चा केली.

तत्पूर्वी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी शुक्रवारी (दि. 18) पवनानगर, चिंचवडगाव परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. पदयात्रेत नाना काटे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक हरिभाऊ तिकोने, राहुल भोईर, सागर चिंचवडे, सचिन निंबाळकर, प्रसन्न डांगे, सचिन आवटे, अजय तेलंग, निर्मला माने, ज्योती निंबाळकर, चंद्रशेकर लोणकर, संदीप शिंदे, कुद्रत खान,नसरीन शेख आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचारादरम्यान वेताळ नगर येथे असणाऱ्या शिवसेना कार्यालयात नानांनी शिवसेना कार्यकर्त्यांची भेट घेतली. शिवसेना कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी महिलांनी नानांचे औक्षण केले. विशेष म्हणजे काही मुस्लिम महिलांनी देखील नानांवरील निष्ठा दाखवत नानांना नाम ओढून पेढा चारून औक्षण केले. शिवसेना कार्यालयामध्ये कुदरत खान (उपविभाग प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी नाना काटे यांना मोठा पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार यांचा निषेध केला.

ही पदयात्रा निवडणूक कचेरी, सिल्वर गार्डन, जुना जकात नाका, पवनानगर, संपूर्ण रस्टन कॉलनी, स्वामी समर्थ हॉस्पिटल मागून वेताळ नगर, चापेकर चौक मस्जिद, चिंचवडे आळीपर्यंत चालली. मोरया गोसावी मंदिर इथे कोपरा सभेने पदयात्रेची सांगता झाली.