पुणे, दि. ६ (पीसीबी) – भाजपाला कसबा आणि चिंचवडमध्ये पराभव दिसू लागल्यावर बिनविरोधची आठवण झाली आहे. त्यांना पंढरपूर , नांदेड आणि कोल्हापूरमध्ये बिनविरोध का नाही आठवले? या पोटनिवडणुकीत भाजपाला किंमत चुकवावी लागेल, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर सोडले.
भाजप नेहमीच दुटप्पी भूमिका घेत आली असून आता कसबा , चिंचवड येथे अडचणी दिसू लागल्यावर बिनविरोधची आठवण त्यांना झाली आहे . मात्र पंढरपूर , नांदेड आणि कोल्हापूर मध्ये आघाडी विनंती करून देखील तेंव्हा का नाही बिनविरोधाचे संकेत आठवले अशा शब्दात आज रोहित पवार यांनी कसबा आणि चिंचवड निवडणूक होण्याचे संकेत दिले. वास्तविक त्यावेळी भाजपाकडे निवडणूक बिनविरोधसाठी विनंत्या करूनही त्यांनी निवडणूक लढविल्या होत्या. ऋतुजा लटके यांच्यावेळी देखील त्यांना निवडणुकीत उभारण्यासाठी किती अडचणी आणल्या तरीही लटके जिंकणार हे लक्षात येताच भाजप आणि शिंदे सेनेने शेवटच्या क्षणाला पाठिंबा दिला होता याची आठवण आमदार रोहित पवार यांनी करून दिली .
आताही टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न देता भाजपने राजकारण खेळण्याचा प्रयत्न केला आहे. ती खेळी तिथल्या नागरिकांना आवडलेली नाही, असे सांगत आता ही निवडणूक सोपी नाही हे भाजपाला देखील कळून चुकले असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत आघाडीने 5 पैकी 4 जागा जिंकल्या असून शिंदे गटाची जागा भाजपने काढून घेऊन कोकणात एकमेव जागा जिंकल्याचे पवार यांनी सांगितले. कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपाची पीछेहाट होईल याची जाणीव त्यांना असल्यानेच आता ते सर्व पक्षांना माघार घेण्याची विनंती करीत आहेत. मात्र प्रत्येक वेळेला स्वार्थ पाहणाऱ्या पक्षाला धडा शिकवायचा असेल तर कधी कधी राजकीय दृष्टिकोनातून लोकशाहीची संधी जेंव्हा मिळते तेव्हा लोकशाहीच्या माध्यमातूनच त्यांना धडा हा शिकवावा लागतो. त्यामुळे या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार येथे उभे राहतील आणि कदाचित याची किंमत भाजपाला मोजावी लागेल अशा स्पष्ट शब्दात आमदार रोहित पवार यांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली.
वंचित आघाडीमुळे गेल्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जागा कमी झाल्या होत्या. आता सर्व विरोधकांनी लोकशाहीला पायदळी तुडवणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात एकत्र येणे गरजेचे असल्याचे थेट संकेत देत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र हे करताना भाजपाला रोखण्यासाठी प्रत्येक नेत्याने आपसातील मतभेद बाजूला सारून जबाबदारीने वक्तव्ये करावीत असा सल्ला देखील दिला.
            
		











































