भाजपच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे काढून तुषार कामठे यांनी उडवून दिली खळबळ

0
256

पिंपरी, दि. 20 (पीसीबी) – भाजपा म्हणजे भ्रष्टाचार्‍यांचा पक्ष बनला आहे. भ्रष्टाचार करणार्‍यांना झाकणे आणि भ्रष्टाचाराविरोधात बोलणार्‍यांना पक्षातून डावलणे असा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे. एकाच कामासाठी दोन -दोन निविदा काढून शंभर कोटी रुपये घशात घालण्याचे काम महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी केले असून ही रक्कम बेमालूम पचविलीही आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मी आवाज उठविल्याने मला पक्षात बाजुला टाकण्यात आले. मात्र, चिंचवडच्या पोटनिवडणुकीत येथील जनता या भ्रष्टाचार्‍यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली.

भाजपचे माजी नगरसेवक असलेल्या तुषार कामठे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी भाजपच्या नेत्यांनी महापालिकेत केलेल्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडेच काढले. त्यांच्या या खळबळजनक भाषणाने भाजपाच्या स्वच्छ कारभाराचे पितळ जनतेसमोर उघडे पडले. या भ्रष्ट कारभाराला पायबंद घालण्याची सुरूवात नाना काटे यांच्या विजयाने होईल. त्यासाठी माझ्या भागातून 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कामठे म्हणाले, इस्टीमेट प्लॅनसाठी 135 कोटींची निविदा मंजूर करण्यात आली. त्यानंतर त्याचा निधी शासनाने परत मागितल्यावर त्याच कामासाठी पुन्हा नव्याने 95 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. एकाच कामासाठी दोनदा निधी वर्ग करून जनतेच्या पैशाची लूट करण्याचा अजब कारभार जगात अन्यत्र कोठेही झाला नसेल. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर मला जाहीर कार्यक्रमात बोलण्याची संधी नाकारण्यात येत होती. बंदीस्त खोलीत नेत्यांपुढेच मला बोलण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र, त्या नेत्यांकडे तक्रार केल्यानंतरही या भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालण्यात आले, त्यामुळे या किळसवाण्या भ्रष्टाचाराचा त्रास सहन होत नसल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

पुण्यात तीन कोटींत होणारे काम पिंपरी चिंचवडमध्ये ३८ कोटींना ?
पुण्यामध्ये दोन किलोमिटरचा रस्ता तयार करण्यासाठी पावणे तीन कोटी रुपये खर्च होतात. तर तेवढ्याच अंतराच्या सांगवी ते विशालनगर या रस्त्यासाठी 38 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. नागरिकांच्या पैशावर ही दरोडेखोरी का? असा सवाल त्यांनी केला. जनता जनार्दन आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या पैशाची राखणदारी करणे, हे माझे कर्तव्य आहे. हीच राष्ट्रवादी काँगेसची शिकवण आहे, असे कामठे यांनी स्पष्ट केले.

माझ्या भागात असणार्‍या महिलांना पाण्याची समस्या भेडसावत होती. सत्ताधारी असतानाही त्याविरोधात आम्ही वेळोवेळी आवाज उठवून त्याकडे दूर्लक्ष करण्यात येत होते. म्हणून मला अखेरीस आंदोलन करावे लागले. तेंव्हापासून मला त्या पक्षात बाजूला टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले, असे कामठे म्हणाले.

अंदाजपत्रकावर भाजपच्या नगरसेवकांनी पाच मिनिटे बोलावे !

महापालिकेच्या अंदाजपत्रकावर अवघ्या पाच मिनिटात मंजूरी मिळवली गेली. सहा हजार कोटींचे अंदाजपत्रक पाच मिनिटाच्या चर्चेत मंजूर कसे झाले? अभ्यासू आणि विद्वान नेत्यांचा पक्ष असा टेंभा मिरवणार्‍या या पक्षाच्या कोणत्याही नगरसेवकाने अंदाजपत्रकावर पाच मिनिटे बोलून दाखवावे, असे आव्हानही कामठे यांनी दिले. ते म्हणाले, 38 कोटी रुपये खर्च करून ‘शो-पीस’ भाजपच्या नेत्यांनी उभारले. हाच पैसा अंडरपास अथवा ब्रिज उभारण्यासाठी वापरला असता तर वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात मिटला असता. परंतू विकासकामांऐवजी भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा प्रकार भाजपात सुरू असल्याने या पक्षाला सत्तेतून हद्दपार करा, असे आवाहनही कामठे यांनी यावेळी केले.