TRS आमदारांना भाजपकडून २५० कोटींची ऑफर ?

0
443

पोलिसांचा फार्महाऊसवर छापा, कोट्यवधींची रोकड रंगेहात पकडली

हैदराबाद,दि.२८(पीसीबी) – येत्या काही महिन्यात तेलंगणा विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) आणि भाजपने यासाठी तयारी सुरू केली आहे. यादरम्यान, पोलिसांनी बुधवारी रात्री हैदराबादच्या बाहेरील एका फार्महाऊसमधून मोठी रोकड जप्त केली आहे. ही रोकड सत्ताधारी TRSच्या चार आमदारांना पद सोडण्यासाठी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार आमदारांना एकूण 250 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पोलिसांनी फार्महाऊसवरील एका कारमधून 15 कोटी रुपये रोख जप्त केली आहे. पैसे ऑफर करणारा भाजप एजंट असल्याचा दावा करण्यात आला असून, तो टीआरएस आमदार रोहित रेड्डी, बी हर्षवर्धन रेड्डी, जी बलराजू आणि रेगा कांथा राव यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.

सायबराबादचे पोलिस आयुक्त स्टीफन रवींद्र यांनी मीडियाला सांगितले की, टीआरएस आमदारांच्या माहितीवरून पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकला. आमदारांना पोलिसांना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सोडण्याचे आमिष दाखवले जात होते. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, एका प्रमुख नेत्याला फार्महाऊसवर झालेल्या गुप्त संभाषणात 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. यासह प्रत्येक आमदाराला 50 कोटींची ऑफर देण्यात आली होती. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर टीआरएसच्या चार आमदारांना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या घरी नेण्यात आले.

टीआरएसचे सोशल मीडिया संयोजक एम कृष्णक यांनी ट्विट केले की, केसीआर यांच्या सरकारच्या विरोधात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे हे षड्यंत्र आहे. त्यांनी अटक केलेल्यांची छायाचित्रे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्यासोबत शेअर केली आहेत. मंत्री आणि टीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनीही हे पोस्ट रिट्विट केले आहे. यातच #TelanganaNotForSale Twitter वर ट्रेंड करत आहे.

दरम्यान, भाजपने याला मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे राजकीय नाटक असल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी बुधवारी रात्री पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विकासावर लोक हसत आहेत. गेल्या तीन दिवसांतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या प्रगती भवनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संपूर्ण फुटेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. कथित “राजकीय नाटक” मध्ये संत आणि पुरोहितांना सामील करून “हिंदू धर्म” कलंकित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही भाजप अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांवर केला.