ज्यांना शहराचे प्रश्नच माहीत नाहीत, या प्रश्नांची जाण नाही ते लोकांचे प्रश्न काय सोडवणार ?

0
245

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांचा सवाल

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्याला पवना बंदिस्त जलवाहिनी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काय आहे हे माहीत नाही हे दुर्दैव आहे. ज्यांना शहराचे प्रश्नच माहीत नाहीत, या प्रश्नांची जाण नाही ते लोकांचे प्रश्न काय सोडवणार? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी केला आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ गुरुवारी पिंपरी चिंचवड मध्ये आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी पवना बंदिस्त जलवाहिनी बाबत विचारले असता त्यांनी मला याबाबत माहीत नाही माहिती घेतो असे सांगितले त्यावर अनिल जाधव यांनी एका पत्रकाद्वारे टिकीची जोड उठवली आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाधव यांनी म्हटले आहे की, पवना बंदिस्त जलवाहिनीतून पाणी आणण्याचा प्रश्न पिंपरी चिंचवड मधील 30 लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचे ठरविले .मात्र पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात मावळ तालुक्यातील बऊर येथे 2011 मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले .पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात मावळ बंद मुंबई पुणे विद्युतगती महामार्गावर बऊर येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी पोलिसांच्या गोळीबारात कांताबाई ठाकर ,मोरेश्वर साठे व शामराव तुपे या शेतकऱ्यांचा बळी गेला काही शेतकरी जखमी झाले तेव्हापासून जलवाहिनीचा प्रश्न प्रलंबित आहे.राष्ट्रवादी व भाजपला हे प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे.

भाजपने हा प्रश्न सोडविण्याच्या वेळोवेळी वल्गना केल्या . मात्र केंद्रात नऊ वर्ष ,राज्यात पाच वर्ष आणि आता फुटीर शिवसेनेसोबतचे सरकार तसेच महापालिकेत पाच वर्षे सत्ता या कार्यकालात भाजपला बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न सोडवता आला नाही. अन आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा भाजपचा नेता हा प्रश्नच माहीत नाही व माहिती घ्यावी लागेल असे सांगत असेल तर ते दुर्दैव आहे शहराचे प्रश्न ज्यांना माहित नाही ते प्रश्न काय सोडवणार असा सवाल अनिल जाधव यांनी केला आहे.

खोटे बोल पण रेटून बोल या पद्धतीने भाजपचा कारभार सुरू आहे.बंदिस्त जलवाहिनी ,रेडझोन, शास्ती कर यापैकी कोणतेच प्रश्न भाजपला सोडवता आले नाहीत. लोकांचे प्रश्न सोडविणे ऐवजी वेगवेगळ्या प्रकारचे वाद निर्माण करण्यात भाजपला रस आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असताना जॅकवेल प्रकरणात काय घोळ झाला ते जनतेला माहिती आहे या प्रकरणात तीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले गेले मात्र भाजपने दुसऱ्यावर खापर फोडण्यातच धन्यता मानली. याची आठवण जाधव यांनी करून दिली आहे. ज्यांना शहराचे प्रश्नच माहीत नाहीत त्यांना चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी केले आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे कलाटे यांची ताकद वाढली आहे चिंचवड मध्ये भाजपला राहुल कलाटेच रोखू शकतात त्यामुळे वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारणी एकमताने कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी कालच सांगितले होते आता वंचित बहुजन आघाडी कलाटे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याचे दिसत आहे