चिंचवडच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत घमासान, आयात उमेदवार असेल तर प्रचार नाही

0
363

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) : चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी उमेदवार आयात करेल, असा सूचक इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील शेळकेंवर चिंचवड विधानसभेची जबाबदारी टाकल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. तेव्हा स्थानिकांनी आयात उमेदवार दिला तर प्रचार करणार नाही अशी भूमिका मांडली. मात्र त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार आयात करेल असा इशारा स्थानिकांना दिला आहे.

शिवसेनेचे राहुल कलाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे दार ठोठावत असल्यानं हा रोष बैठकीत दिसून आला. मात्र राहुल कलाटे बाहेरचे नसून महाविकास आघाडीमधील आहेत आणि विजयी उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार असंही शेळकेंनी स्पष्ट केलं. हे सांगताना मग तुमचा उमेदवार कोण? असा प्रश्न विचारला असता घड्याळ म्हणत आयात उमेदवार असेल हे ही अप्रत्यक्षपणे सूचित केलं.

सुनील शेळके म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडीमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी स्पर्धा आहे मात्र यामध्ये महाविकास आघाडी चिंचवड विधानसभा आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये चिंचवडची जागा ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मिळावी यासाठी आम्ही आणि पक्षातील सर्वांनी आग्रह धरला आणि त्यावर सकारात्मक चर्चा सुरु आहे. मात्र महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष एकत्रित येत असताना अनेकांनी देखील उमेदवारीसाठी इच्छा दर्शवली आहे. येत्या काही तासात या सर्व विषयांवर निर्णय होईल आणि हा निर्णय सकारात्मक करुन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी एकजुटीने उभी राहिलं, असं ते म्हणाले.

राहुल कलाटे देखील महाविकास आघाडीचेच इच्छुक आहेत. मात्र स्थानिक पातळीवर सर्वांच्या भावना लक्षात घेता. महाविकास आघाडी किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राहुल कलाटे यांना या उमेदवारीसाठी विरोध होत आहे. स्थानिक नेते उमेदवारी आयात नको म्हणून ठामपणे सांगत आहेत असं विचारलं असता ते म्हणाले की, काहीही असलं तरीही कार्यकर्त्यांचं मत देखील जाणून घेतलं पाहिजे. पक्षाचं खऱ्या अर्थानं काम कार्यकर्ते करत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना त्यांची मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील ते कार्यकर्ते मान्य करतील, असं ते म्हणाले. मात्र काहीही झालं तरी आमचा उमेदवार घड्याळ म्हणत उमेदवार राष्ट्रवादीचा असेल आणि आयात होऊ शकतो असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.