कोश्यारी नावाची महाराष्ट्राची ‘पीडा’ गेली – अजित गव्हाणे

0
296

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर गव्हाणे यांचा टोला !

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) -राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या मागे लागलेली पीडा अखेर आज गेली. राज्यपाल पदावर कार्यरत असलेल्या कोश्यारींकडून उठसुठ महापुरुषांना बदनाम करणे, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणे, वारंवार त्यांचा अपमान करणे हे प्रकार जाणूनबुजून केले जायचे. या प्रकारानंतर राज्यातील वातावरण गढूळ झाले. जनमानसात आपल्याबद्दल उसळलेल्या संतापाची चाहूल लागल्यानेच कोश्यारी यांनी स्वतः राजीनामा देऊन महाराष्ट्रावरील ग्रहणच दूर केले. किंबहुना त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्याची पीडा गेली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपालपदावरुन दूर करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले. महापुरुषांचा वारंवार अवमान करणार्‍या कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. यानंतर राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर गव्हाणे यांनी पत्रकाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली.

गव्हाणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे. आपल्या महाराष्ट्राचा आदर्श केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये घेतला जातो. लोकांचं राज्य पहिल्यांदा खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. अशा आदर्श छत्रपती शिवरायांचा अपमान करत भगतसिंग कोश्यारी यांनी वारंवार त्यांच्याबद्दल जाहीरपणे चुकीची वक्तव्य केली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही राज्यपालांनी अतिशय बेताल वक्तव्य केली. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने महापुरुषांचा अपमान मुकाट सहन करणारं मुर्दाड सरकार सत्तेत आल्यामुळे कोश्यारींसारख्या विद्वेषी प्रवृत्तीच्या लोकांना आयतं बळ मिळालं होतं. मात्र, सगळीकडे वाढता रोष पाहून कोश्यारींनी स्वतः निघून जाण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला. एका अर्थी महाराष्ट्राला ग्रासलेलं ग्रहण व पीडा दूर गेली, असं म्हणायला हरकत नाही.

राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी या पदाची बूज राखतानाच महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास करावा. तसेच हे राज्य निर्माण केलेल्या महापुरुषांचा आदर राखावा अशी अपेक्षा आहे. यापुढे महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, असा सज्जड इशारा अजित गव्हाणे यांनी पत्रकातून दिला.