विद्वत संमेलनात उलगडला संविधानाचा अन्वयार्थ

0
296

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश सामाजिक समरसता विभागाच्या वतीने रविवार, दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय विद्वत संमेलनात भारतीय संविधानाचा अन्वयार्थ उलगडत गेला. लेडी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता, पुणे येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय समरसता विभागप्रमुख देवजीभाई रावत, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. के. जैन, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत, मधुभाई कुलकणी, प्रा. संजय मुदराळे, गणेश मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनानंतर ‘भारतीय संविधान आणि संतसाहित्य अंतरंग संबंध’ या परिसंवादात प्रा. दिगंबर ढोकले यांनी, “संतांचे संविधान विश्वव्यापक आहे!” आणि ह. भ. प. सुभाषमहाराज गेठे यांनी, “संविधानातील तत्त्वे आणि संतांची शिकवण एकच आहे!” अशी मते मांडली. प्रा. डॉ. श्यामा घोणसे यांनी, “संतसाहित्याने मनपरिवर्तन केले; तर संविधानाला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे!” असे अध्यक्षीय प्रतिपादन केले.

‘भारतीय संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्य’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात ॲड. सतीश गोरडे यांनी राज्यघटनेतील पंचवीस ते अठ्ठावीस क्रमांकांच्या कलमांचा संदर्भ उद्धृत करून, “हिंदू जीवनमूल्ये ही नैतिकतेवर आधारित असून ती सर्वसमावेशक आहेत. त्यामुळे अन्य पंथीयांनी धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रहिताचा बळी देणे संविधानाला अपेक्षित नाही!” असे विचार मांडले; तर ॲड. प्रशांत यादव यांनी, “धार्मिक स्वातंत्र्याची कठोर समीक्षा झाली पाहिजे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी परिसंवादाच्या अध्यक्षीय मनोगतातून, “असंघटित हिंदू समाजावर अन्य संघटित धर्मसंस्था संविधानाच्या आधाराने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाने एकमुखाने आपल्या कुप्रथांचा विरोध केल्याशिवाय संविधानाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही!” असे मत मांडले. ‘भारतीय संविधान आणि सामाजिक समरसता’ या विषयावरील तिसऱ्या परिसंवादात सागर शिंदे आणि प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कुंभार यांनी सामाजिक समरसता परिषदेची गरज, कार्यपद्धती, संविधानाशी अनुबंध यांविषयी ऊहापोह केला. प्रा. डॉ. रमेश पांडव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून चळवळीतील प्रत्यक्ष अनुभवांचे कथन केले. विद्वत संमेलनाच्या समारोप सत्रात गणेश मोकाशी यांनी संमेलनाचा आढावा घेतला. ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांनी, “विद्वत संमेलन ही एक ऐतिहासिक घटना आहे!” असे गौरवोद्गार काढून भारतीय संविधानाविषयी विस्तृत अन् अभ्यासपूर्ण माहिती दिली. रवींद्र गोळे, बापूराव भोळे, डॉ. माणिक सोनवणे, माधवी संशी, श्रीरंग राजे, महेंद्र देवी, प्रा. डॉ. धनंजय भिसे, काशिनाथ पवार, दिनेश लाड, गणेश वनारसे यांनी संयोजनात सहकार्य केले. डॉ. सोमनाथ सलगर यांनी सूत्रसंचालन केले. निखिल कुलकर्णी यांनी आभार मानले.