घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त खुर्च्यांचीच गर्दी

0
298

पुणे, दि. १३ (पीसीबी) – कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघातील आमदारांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. काटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. आज चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे ४० गद्दार आमदार जातात तिथे ५० खोक्यांची घोषणा होते. ही घोषणा ऐकल्यावर त्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे पोलिसांना पाठवलं जातं. त्यांच्या घरावर धाड पडते. केंद्रीय यंत्रणा त्यांच्या मागे लागते. परंतु राज्यात झालेली ही गद्दारी कोणालाच पटलेली नाही. मुख्यमंत्री आणि ४० आमदारांनी उद्धव साहेबांच्या पाठीत वार केले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत अनेक आमदार, खासदारांनी पक्षाची विचारणी न पटल्यामुळे किंवा कोणत्याही कारणास्तव पक्ष बदलले आहेत. परंतु या नेत्यांनी रीतसर राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. परत निवडणूक देखील लढवली. परंतु जे राज्यात झालंय, तसं राजकारण यापूर्वी कधीही झालं नव्हतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक होत आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही (महाविकास आघाडी) जातो तिथे सभांना मोठी गर्दी होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरातांच्या सभांना मोठी गर्दी होते. परंतु तुम्ही कधी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभांना गर्दी झालेली पाहिली आहे का? तिथेही गर्दी होते, पण फक्त खुर्च्यांची. आमच्या सभेला जनता गर्दी करते तर त्यांच्या सभांना फक्त खुर्च्यांची गर्दी होते.