भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांनी सोसायटीधारकांवर पाणीटंचाई लादली

0
252

– खासदार वंदनाताई चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल

वाकड, दि. 20 (पीसीबी) – राष्ट्रवादीची महापालिकेत सत्ता असताना पुरेसा पाणीपुरवठा होत होता. मात्र भाजपच्या सत्ताधारी नेत्यांनी पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे आतापर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. एक दिवसाआड, अपुऱ्या तसेच अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलांची मोठी तारांबळ होत असून सोसायटीधारकांवर भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांनीच पाणीटंचाई लादल्याचा आरोप खासदार वंदनाताई चव्हाण यांनी केला.

वाकड, पिंपळे निलख परिसरातील अनेक सोसायटींना आज महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ भेट देत नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी चव्हाण बोलत होत्या. यावेळी सोसायटीधारकांनी आपल्या असंतोषाला वाट करून दिली. खासदार चव्हाण यांनी या महिला आणि नागरिकांना प्रश्नाची तड लावण्याचे आश्वासन देत आश्वस्त केले. यावेळी चव्हाण यांच्यासोबत प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक तुषार कामठे, मयूर कलाटे, प्रभाकर वाघेरे, यांच्यासह संकेत जगताप, शिरीष अप्पा साठे, आकाश साठे, विशाल वाकडकर, नानासाहेब काटे, माधव पाटील व महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार चव्हाण म्हणाल्या, ‘या भागाचा विकास अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली झाला. या भागाला पुरेसे पाणी मिळावे म्हणून अजित पवार यांनी पवनेतून बंद पाईपलाईनने पाणी आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, आज सत्तेवर असणाऱ्या आणि त्यावेळी विरोधात असणाऱ्या राजकारण्यांनी त्याला विरोध केला. शहराचा वाढणारा भाग आणि लोकसंख्या यांचा विचार करून त्यांना लागणाऱ्या पाणीपुरवठा आणि अन्य सुविधांचे नियोजन करण्याची दूरदृष्टी अजित पवारांकडे होती आणि आहे. ती दृष्टी भाजपचे नेते व नगरसेवकांकडे नसल्याने हे प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिकेच्या पाच वर्षांच्या योजनाशून्य कारभाराचा फुगा त्यामुळे फुटला आहे. भ्रष्टाचारी कारभारामुळे शहर अधोगतीकडे जात आहे. यातून शहराला पुन्हा उभारी घ्यावयाची असल्याने नाना काटे यांना बहुमाने विजयी करा. महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणारी संवेदनशीलता या सत्ताधाऱ्यांकडे नसल्याची टीकाही त्यांनी केली.

नाना काटे यांच्या सारख्या विकासाची व्हिजन असणाऱ्या आणि त्यासाठी कटीबध्द असणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याची हीच खरी वेळ आहे. भाजपच्या भ्रष्ट आणि मतलबी कारभाराला कंटाळल्याने नाना काटे यांच्या विजयाचा निर्धार नागरिकांनीच केला असल्याचे मला स्पष्ट जाणवत आहे, आपल्या आशिर्वादाच्या ताकदीवर आणि पाठींब्यावर नाना काटे विजयी होतील आर विश्वासही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

शरद पवारांमुळे आयटी कंपन्या आल्या
या शहराचा विकास करायचा असेल तर आयटी क्षेत्राला पर्याय नाही, याची जाणीव शरद पवार यांना ९० च्या दशकातच झाली होती. त्यामुळे हिंजवडी भागात होणारा साखर कारखाना स्थलांतरीत करून तेथे आयटी हब उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळेच आज पुण्याचा नावलौकीक जगभर पसरला आहे. त्याला बाधा आणण्याचे काम भाजपचे सत्ताधारी करत आहेत, गेल्या ८ वर्षांत भाजपने या ठिकाणी एकही नविन कंपनी आणून रोजगार उपलब्ध करून न दिल्यामुळे अनेक आयटी अभियंत्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. आयटी क्षेत्र पुन्हा सावरायचे असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, त्यांना विजयी करा, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना केले.

मी नगरसेवक असताना पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाईप आणले होते. त्याला गंज चढून ते बाद झाले. पण, पाईपलाईनचे काम काही भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केले नाही. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. ही समस्या सोडवण्याचे काम नाना काटे पूर्ण करतील याची मला खात्री आहे, मलाच नाही तर या भागातील जनतेलाही त्याची खात्री आहे, त्यामुळे नाना काटे विजयी होतील यात तीळमात्र शंका नाही, असा विश्वास तुषार कामठे यांनी व्यक्त केला.