आमदारांच्या सरणाची राख अजून शांत झाली नसेल तोच लगेच पोटनिवडणुका घेतल्या

0
223

– वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

पुणेे, दि. ९ (पीसीबी) – कसब्यातील आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झालं. त्यामुळं दोन्ही ठिकाणी आता पोटनिडणुका लागल्या आहेत. ही निवडणूक त्यांच्या निधनानंतर एका महिन्यात लागली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या होत्या. आता तोच मुद्दा धरून पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. याबाबत वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करीत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचा निवडणुकीमागील हेतूबाबतही शंका उपस्थित केली.

ते म्हणाले की, “गेल्या वर्षापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासक आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांची अनेक कामे रखडलीत. त्यामुळं वर्षभरात महानगरपालिकेच्या निवडणुका होणं अपेक्षीत होतं. त्या झाल्या नाहीत. मात्र विधानसभेच्या पोटनिवडणुका लगेच कशा काय घेता?”.
वसंत मोरे फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, “माझा शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दोन आमदारांचा मृत्यू झाला. त्यांच्या सरणाची राख अजून शांत झाली नसेल. तुम्हाला मात्र तुमच्या मतांची चिंता. त्यामुळं लगेच पोटनिवडणुका घेतल्या.”

वर्षभरापासून महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे शहरातील विकासकामे रखडल्याचा आरोपही मोरे यांनी केला. ते म्हणाले, “एक वर्षापासून शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकासकामे ठप्प झाली आहेत. निधी नसल्यामळे नागरिकांना तोंड दाखवू वाटत नाही.”

शहरातील विकासकामे रखडल्याची खंत व्यक्त करून मोरे यांनी आमदार-खासदारांनाही आव्हान केलं. मोरे म्हणाले, “पुण्यातील आमदार, खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पाहावे”, असं म्हणत मोरे यांनी काम करता येत नसल्याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.
यानंतर राज्य सरकारलाही टोला लगावला आहे. मोरे म्हणाले, “जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा. कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार…”, अशी भावना मोरे (Vasant More) यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.