पिंपरी (दिनांक : १८ फेब्रुवारी २०२३) महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशन आयोजित तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेत एकपात्री हास्यकलाकार योगेश सुपेकर यांनी अंतिम पुष्प गुंफताना शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘कॉमेडी कॉकटेल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांना हास्यरसात चिंब भिजवले.
उद्योजक लक्ष्मण टकेकर, बजरंग गडदे, संजय ढेंबरे, संजय जाधव, डी. पी. माळी, कामगारनेते विलास सपकाळ, व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे आणि शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानमाला समन्वयक राजेंद्र घावटे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या; तर संतोष रांजणे यांनी प्रास्ताविकातून एकवीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या शिवमंदिर स्थापनेच्या आठवणींना मिस्कील शैलीतून उजाळा दिला.
योगेश सुपेकर म्हणाले की, “अन्नाचा कण अन् हास्याचा क्षण कधीही वाया घालवू नये; कारण हास्यरस हा जीवनाचा राजमार्ग आहे, असे आचार्य अत्रे यांनी म्हटले होते. हल्लीच्या ताणतणावाच्या काळात व्यक्त होणे खूप गरजेचे आहे!” अनुरूप देहबोली, वाचिक अभिनय आणि अचूक टायमिंग यांचा सुरेख समन्वय साधत योगेश सुपेकर यांनी श्रोत्यांचे प्रकार, माणसांच्या हसण्याच्या पद्धती, मोबाईलचे अतिवेड, प्रेमवेड्यांच्या नाना तऱ्हा, महिलांचे टीव्ही मालिकाप्रेम, जाहिरातींमधील विसंगती, अतिउत्साही रसिकांनी केलेल्या पंचायती, हल्लीच्या सिनेमांची चित्रविचित्र नावे, तथाकथित आधुनिक काळातील वेडपट शिष्टाचार अन् अतिऔपचारिकता, महिलांची क्षणाक्षणाला बदलणारी मानसिकता अशा अनेक विषयांवरील विनोद सादर करीत रसिकांना खळखळून हसवले.
कुत्र्याच्या भीतीमुळे मराठी चित्रपट कलावंतांच्या काल्पनिक प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया, राजकीय नेत्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील शुभेच्छा आणि केवळ वाचिक अभिनयातून बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची ओळख या तिन्ही प्रकारच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांची दाद दिली. “कलाक्षेत्र हे बेभरवशाचे आहे; पण कलाकारांना रसिकांच्या टाळ्यांचे मोल सर्वात जास्त असते. दोन श्वासांतील अंतर म्हणजे आयुष्य असते; आणि हे आयुष्य हसण्यासाठीच आहे!” असे सांगून त्यांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले.
ह.भ.प. निवृत्तीमहाराज यांच्या आवाजाचा नमुना पेश करून योगेश सुपेकर यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला. खंडू बारवकर, रंगराव चव्हाण, अजित भालेराव, विद्या राणे, हनुमंत जाधव यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सविता बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष रांजणे यांनी आभार मानले.