TCS कंपनीने घेतला मोठा निर्णय

0
15

देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सध्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत आहेत. बदलत्या ग्राहक मागण्या, ऑटोमेशनचा वाढता वापर आणि नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे . जागतिक स्तरावर टीसीएसमध्ये सुरु असलेल्या या नोकरकपातीमुळे टाटा समूहावर टीकेचा वर्षाव होत आहे, तसेच काही आरोपांनुसार कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामे घेण्याचा प्रश्नही समोर आला आहे.

याच पार्श्वभूमीवर, कंपनीने एक महत्वाचा आणि ठोस निर्णय घेतला आहे. TCS सध्या अशा कर्मचाऱ्यांची पुनर्रचना करत आहे ज्यांचे तांत्रिक ज्ञान कालबाह्य झाले आहे किंवा जे नव्या कामकाजाच्या प्रणालींशी जुळवून घेण्यात अपयशी ठरत आहेत. कंपनीचा यामागे असलेला दृष्टिकोन असा आहे की, नव्या युगात टिकण्यासाठी नव्या कौशल्यांची गरज आहे, त्यामुळे जुनी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर काढले जात आहे.

TCS ने कर्मचाऱ्यांसाठी सहानुभूतीपूर्ण उपाययोजना उचलली आहे. कंपनी केवळ कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करत नाहीये, तर त्यांच्या पुढील भविष्याला आधार देण्यासाठी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतचे वेतन पॅकेज देत आहे. रतन टाटांच्या मूल्यांचा वारसा जिवंत ठेवत TCS ने या निर्णयातून कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि नव्या संधी शोधण्यासाठी वेळ दिला आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून मुक्त करण्याची घोषणा केली होती, परंतु आता त्यांना दीर्घकालीन वेतन पॅकेज देण्याची तयारी दर्शवली आहे.

या कपातीमध्ये सर्वप्रथम ज्या कर्मचाऱ्यांची भूमिका आणि कौशल्ये सध्याच्या कंपनीच्या गरजांशी जुळत नाही, त्या कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. विशेषतः मध्यम व वरिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांना हा परिणाम सर्वाधिक भोगावा लागू शकतो. नोकरकपातीची प्रक्रिया केवळ वर्तमानापुरती मर्यादित नसून, भविष्यातही ज्यांचे कौशल्य संच बदलत्या तांत्रिक मागण्यांशी जुळत नाही, त्यांच्यावर अंमलबजावणी होणार आहे.

कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा नोटीस पगार दिला जाणार :

TCS च्या ऑफरमध्ये प्रभावित कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा नोटीस पगार दिला जाणार आहे. त्यानंतर, त्यांच्या सेवेचा कालावधी आणि पदानुसार अतिरिक्त सेवा वेतन दिले जाईल. १५ वर्षांहून अधिक सेवा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. तसेच, ‘बेंच’वर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा प्रस्ताव आहे. सतत आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ कोणत्याही प्रोजेक्टवर कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा नोटीस पगार मिळेल, तर १० ते १५ वर्ष सेवा केलेल्या बेंच कर्मचाऱ्यांना सुमारे १.५ वर्षांचे वेतन पॅकेज दिले जाईल.

TCS चा हा निर्णय नोकरकपातीच्या कठीण काळातही कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य राखण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. रतन टाटांच्या शिकवणीनुसार, नफा आणि व्यवसायाबरोबरच कर्मचाऱ्यांच कल्याण राखणे हे कंपनीच्या धोरणात समाविष्ट असावे, हे पुन्हा एकदा TCS ने दाखवून दिले आहे.